नवी दिल्ली – विशाखापट्टणम येथील हेरगिरीच्या प्रकरणात एनआएने आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर कंपनीच्या प्रमुख हेराला अटक केली आहे. गितेली इम्रान असे या हेराचे नाव असून तो 37 वर्षीय आहे. तो गुजरातच्या गोध्राचा रहिवासी आहे.
सोमवारी त्याला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत असल्याचे अनेक पुरावे एनआयएने जमा केले आहेत.
भारतात आयएसआयकडून मोठे रॅकेट चालवले जात असून देशातील महत्त्वाच्या संरक्षण आस्थापनांच्या कामांची हेरगिरी करण्यासाठी अनेक तरुणांची भरती केली जात आहे. अशी भरती विशाखापट्टणम येथे सुरू होती.
त्याचा सुगावा लागल्यानंतर या साऱ्या प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे. याकामी भरती केलेले एजंट सोशल मीडियाचा वापर करून काही नौदल कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याचीही बाब तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात 15 जून रोजी चौदा जणांच्या विरोधात या आधीच आरोपपत्र दाखल झाले आहे.