जगाने त्यांचे मृत्यू पाहिले, पण मोदी सरकारकडे त्यांची नोंदच नाही

स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधींची मोदींवर टीका

नवी दिल्ली – स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूची नोंद सरकारकडे नाही म्हणून त्यांना नुकसानभरपाई देण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, असे उत्तर आज केंद्रीय मजूर मंत्री संतोषकुमार गंगावार यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिले आहे. त्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

स्थलांतरित मजुरांचे लॉकडाऊनच्या काळात मोठे हाल झाले. त्यातून अनेकांचे प्राण गेले. त्यांचे मृत्यू जगाने पाहिले आहेत पण मोदी सरकारकडे मात्र त्याची नोंदच नाही, असे त्यांनी म्हटले.

लॉकडाऊनच्या काळात किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि स्थलांतराच्या काळात किती मजुरांचे प्राण गेले याची सरकारला काहीच माहिती नाही. या मजुरांच्या मृत्यूची नोंद नाही म्हणून त्यांचे मृत्यूच झालेले नाहीत असे सरकारला म्हणायचे आहे काय? असा प्रश्‍नही त्यांनी ट्विटरवर विचारला आहे.

राहुल गांधी हे सध्या त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांना उपचारासाठी अमेरिकेला घेऊन गेले आहेत. तेथून त्यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.