स्वस्थ भारत योजनाही जुमलाच आहे काय?

रामगोपाल यादव यांचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली – मोदी सरकारने प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना आणली आहे. त्या योजनेवर तब्बल 65 हजार 560 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. सरकारकडे इतके पैसे आहेत काय, हा निधी सरकार कोठून आणणार आहे? असा प्रश्‍न करीत ही योजनाही मोदी सरकारचा आणखी एक जुमला आहे काय, असा प्रश्‍न समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी केला आहे.

ते म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात आरोग्य विभागाने 1 लाख 17 हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असताना त्यांना केवळ 65 हजार कोटी रुपयेच देण्यात आले असताना आता आणखीन स्वस्थ भारत योजनेसाठी सरकार 65 हजार 560 कोटी रुपयांचा वेगळा निधी सरकार कोठून आणणार आहे याचा खुलासा व्हायला पाहिजे. का ही नुसतीच घोषणाबाजी आहे असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

आरोग्य मंत्रालयाचे पूर्ण बजेटच जर 65 हजार कोटींचे आहे तर त्यांना आणखी वेगळे 65 हजार कोटी रुपये कोठून येणार आहेत ते लोकांना समजले पाहिजे, असे ते म्हणाले. या स्वस्थ भारत योजनेतून नेमका कोणाला लाभ होणार आहे हेही आरोग्यमंत्र्यांनी जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.  हर्षवर्धन यांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या योजनेची घोषणा करीत त्या योजनेसाठी 65 हजार 561 कोटी रुपयांची तरतूद केली जात असल्याची घोषणा केली होती. या योजनेतून करोनाचा मुकाबला करतानाच देशातील आरोग्यविषयक सुविधा वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

तथापि, देशातील लोकांना आरोग्य योजनांचा लाभ होत नसल्याचा दावा यादव यांनी केला. ते म्हणाले की, देशातील 78 टक्‍के करोनाग्रस्त रुग्ण कोणत्याही औषधोपचाराविनाच बरे झालेले दिसून आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.