मावळ : प्राथमिक शिक्षक सहकारी गृहरचना संस्थेत गैरव्यवहार

  • दोषी संचालकांवर गुन्हे दाखल होणार : सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांची माहिती

वडगाव मावळ – मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी गृहरचना संस्थेत भ्रष्टाचार झाला असून, या गैरव्यव्हाराची सखोल चौकशी सुरू केली आहे. तसेच संस्थेच्या दोषी संचालक मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी दिली.

शिक्षक सहकारी गृहरचना संस्थेच्या विरोधात रामदास बाबुराव मोढवे व दादासाहेब सदाशिव पवार यांनी लेखी तक्रार मंगळवारी (दि. 15) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे केली. या संस्थेत झालेल्या गैरव्यव्हाराची सुनावणी शुक्रवारी (दि. 18) होणार आहे. या संस्थेबाबत पूर्वी अनेकदा तक्रारी आल्या होत्या.

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी गृहरचना संस्थेची स्थापना 1987 साली झाली. संस्थेची जागा जिल्हाधिकारी मंजूर आराखड्यानुसार प्लॉटचे वाटप केले नाहीत. मोकळ्या जागा दाखवून प्लॉट विकले आहेत. एकाच प्लॉट वेगवेगळ्या लोकांना विक्री करीत आहेत. सभासदांचे प्लॉट सोडून दुसऱ्या जागी बांधकाम केले आहेत.

उच्चदाब विद्युत वाहिनीखाली बांधकाम केले असून, जाणीवपूर्वक अतिक्रमण केले आहेत. संस्थेकडे तक्रार केल्यास तक्रारीची दखल घेतली जात नाही. प्लॉट हस्तांतरण करताना मनमानी रक्‍कम घेत असून, सभासदांनी मोक्‍याच्या असलेले भूखंड बळकावले आहे, असा ठपका संस्थेच्या संचालक मंडळावर ठेवण्यात आल्या आहेत.

याशिवाय प्लॉट वाटपात अनियमितता दिसते, काहींना 999 वर्ष, तर काहींना 99 वर्षांचा करार करुन दिला आहे. कित्येक वर्षांपासून संचालक मंडळाच्या निवडणूक झाली का नाही, याची माहिती मिळत नाही. संस्थेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची चर्चा आहे. संस्था नोंदणीपासून आतापर्यंत संचालक मंडळ दोषी आहेत. यांची सहाय्यक निबंधक सखोलपणे चौकशी करुन सर्वांवर गुन्हे दाखल करणार आहेत.

संस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा मुद्रांक बुडाला आहे. लेखा परीक्षणाचा अहवाल कुठल्याही सभासदाला देत नाही. मयत संचालकांच्या जागी मर्जीतले संचालक निवडले जातात. या संस्थेबाबत आणखी कोणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी सहाय्यक निंबधक सहकारी संस्था मावळ तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले आहे.

मावळ सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे संस्थेच्या विरोधात काही सभासदांनी तक्रार केली आहे. मात्र तक्रारीत तथ्य नाही, संस्थेची सर्व कागदपत्र आम्ही दाखल करून आमची बाजू प्रभावीपणे मांडणार आहोत. तसेच संस्थेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यव्हार झाला नाही.
– व्ही. एम. शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक सहकारी गृहरचना संस्था.

Leave A Reply

Your email address will not be published.