पुणे- खडकवासला जलकेंद्रातून पाणी उचलण्यासाठी महापालिकेने बांधलेल्या जॅकवेलच्या ठिकाणी पाटबंधारे अधिकाऱ्यास प्रवेश असणार आहे. महापालिकेच्या पाणी वापराबाबत सुरू असलेल्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे सुरू असलेल्या सुनावणीत याबाबतचे आदेश महापालिकेस देण्यात आले आहेत.
या जॅकवेलमधून महापालिका शासनाने मंजूर केलेल्या पाण्याच्या कोटयापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचा दावा करत पाटबंधारे विभागाकडून अनेकदा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना प्रवेश देण्याची मागणी केली जात होती. मात्र, पालिकेकडून त्यास नकार दिला जात होता. मात्र, अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्यास पालिकेस पाणी वापरावर निर्बंध आणावे लागणार आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात महापालिका आणि पाटबंधारे विभागात नव्या वादाला तोंड फुटणार आहे. दरम्यान, पुढील सुनावणी येत्या 17 मार्च रोजी होणार असून यावेळी महापालिकेस पाणी वापर कमी करण्याचा आराखडा सादर करावा लागणार आहे.
जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने यापूर्वीच महापालिकेचा पाणी वापर जास्त असल्याचे निरीक्षण नोंदवत पालिकेने लोकसंख्ये नुसार, प्रत्येक वर्षी पाण्याचे अंदाजपत्रक सादर करावे तसेच प्रत्येक वर्षाला किती पाणी वापरावे याचे निकष घालून दिले आहेत. त्यानंतरही प्रत्यक्षात महापालिकेचा पाणी वापर जास्तच असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाकडून वारंवार महापालिकेस कळविले जात आहे. डिसेंबर 2021 मध्ये पाटबंधारे विभागाने थेट महापालिकेचे पाणी पोलीस बंदोबस्तात कमी करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने हा वाद टळला होता.