सासवड – पुरंदर तालुक्यातील यादववाडी- सटलवाडी येथील शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य महेश काशिनाथ यादव (वय 46) व शेतकरी भुजंग काशिनाथ यादव (वय 49) यांच्या शेतामध्ये सासवड पोलिसांनी धाड टाकून 50 किलो वजनाचा अंदाजे 1 लाख रुपये किंमतीची अफुची झाडे व बोंडे जप्त केली. अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप व त्यांच्या पथकाने ही कारवाई रात्री सातच्या दरम्यान केली. सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादववाडी- सटलवाडीत यादव यांच्या गट नं. 1681 या शेतात अफूची लागवड केली असल्याची माहिती घोलप यांना मिळाली. पोलीस निरीक्षक घोलप यांनी खात्री रात्री त्यांच्या शेतात पाहणी केली असता त्यांना अफूची झाडे आढळून आली.
त्यानंतर पोलिसांनी 40 ते 50 किलोची बोंडे जप्त केली. या बोंड्यापासून लाखो रूपयांची अफू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. ही कारवाई अनिल खोमणे, गणेश पोटे, निलेश जाधव, सुभाष लाटणे, जब्बार सय्यद, सूरज नागरे, प्रतीक धिवार, विक्रम भोर, पोपट यादव, यांनी केली. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे पदाधिकारी असलेले यादव यांच्यावर कारवाई झाल्याने पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईने चर्चेला उधाण आले आहे. धडाकेबाज कारवाई केल्याने सासवड पोलिसांचे कौतुक होत आहे.