जुन्नर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून पुतळ्याची आगमन मिरवणूक रविवारी (दि. 13) सकाळी 10. 30 वाजता श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारातून सुरू होईल व पाचरस्ता चौकात सांगता होणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दिली.
पाचरस्ता चौक येथील जुना पुतळा काढून त्याठिकाणी नवीन शिवजन्मभूमीला साजेसा पुतळा बसवावा, असा जुन्नर शहरवासीयांचा व सर्व नगरसेवकांचा मानस असल्यामुळे पुतळा नवीन बसविण्याचा ठराव दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी घेतल्यानंतर कार्यवाही सुरु झाली. पुणे येथून हा पुतळा निघाल्यानंतर 12 तासांमध्ये जुन्नर येथे येणार आहे.
सर्व परवानगीने पुतळ्याचे काम दि. 18 जून 2021 सुरू झाले असून दि. 10 मार्च 2022 रोजी पुतळ्याचे काम पूर्ण झाले. 9 महिने हे काम 10 ते 12 कारागिरांनी केल्यानंतर ते शुकवारी (दि. 11) पूर्णत्वास आले आहे. पुतळ्याची मिरवणूक पारंपरिक वाद्यात निघणार आहे. पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम तांबोळी अण्ड असोसिएट, पुणे यांनी पूर्णपणे डिझाईन केलेले असून राजू सापळे व मुकेश ताजणे यांनी हे काम केले आहे.
17 फूट उंच ब्रॉंझ धातूचे शिल्प
पुणे येथील शिल्पकार निलेश खेडकर यांनी या शिल्पाचे काम केले असून पुतळ्याची उंची 17 फूट आहे. हा पुतळा संपूर्णपणे ब्रॉंझ धातूचा असून त्याचे वजन सुमारे 4 टन असणार आहे.