राजगुरूनगर-तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायी असलेल्या येथील चांडोली (राजगुरुनगर) रुग्णालयात भोंगळ कारभार सुरु आहे. देशात करोना विषाणूचा हाहाकार असून सर्वच डॉक्टर रुग्णांना सेवा देण्यात सज्ज आहेत. देवदूत म्हणून काम करत आहेत. मात्र याला चांडोली (राजगुरूनगर) ग्रामीण रुग्णालय अपवाद ठरत आहे. वैद्यकीय अधिक्षकांच्या खुर्चीवर चक्क लेखनिक झोपलेला सापडल्याने रुग्णालयाच्या सेवेबाबत उदासीन कारभार चव्हाट्यावर आला आहे आठ पैकी केवळ एक डॉक्टर येथील रुग्णालयात उपस्थित होता तर हजेरी रजिस्टर वर सर्वांची उपस्थिती दाखवून आरोग्य विभागासह नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम येथील डॉक्टर करत असल्याची बाब आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रत्यक्ष रुग्णालयाला भेट देऊन समोर आणली आहे.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्यातील रुग्णाची सोय होण्यासाठी राज्याकडे पाठपुरावा करून १४ वर्षांपूर्वी राजगुरूनगर शहरालगत चांडोली ग्रामीण रुग्णालय सुरु केले. सुरुवातील या रुग्णालयात चांगली सेवा मिळत होती मात्र मध्यंतरी पाच वर्षाच्या काळात या रुग्णालयाकडे मोठे दुर्लक्ष झाल्याने रुग्णांच्या समस्यांमध्ये वाढ झाली. गेली काही दिवसांपासून येथील रुग्णालयात रुग्नांना सुविधा मिळत नसल्याने आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दोन महिन्यापुर्वी भेट देऊन आढावा घेतला होता. मात्र आज (दि.२३)रोजी दिलेल्या भेटीतून त्यात कोणतीच प्रगती नव्हती उलट अधोगती झालेले पाहायला मिळाले.
आमदार दिलीप मोहिते यांनी आज येथील रुग्णालयाला भेट दिली असता येथे विविध आजारांवर उपचारासाठी तालुक्यातून आलेले नागरिक तिष्ठत उभे होते. मुख्य गेट अर्धवट ओढून घेऊन वैद्यकीय अधीक्षकांच्या टेबलावर लेखनिक टेबलवासार पाय ठेवून झोपलेला सापडला. शिपाई अन डॉक्टरांचा पत्ता पत्ताच नव्हता. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य अधिकारी, कर्मचारी याना २४ तासांची सेवा लागू केली असताना आरोग्य सेवेसाठी तत्पर राहण्याची गरज असलेल्या चांडोली (राजगुरुनगर) ग्रामीण रुग्णालयातील ही अवस्था तालुक्याचे आमदार दस्तुरखुद्द दिलीप मोहिते पाटील यांच्या निदर्शनास आली.
हा प्रकार पाहू आमदार मोहिते पाटलांचा पारा चढत,चढत गेला. हजेरी रजिस्टर मागितले असता त्यात सर्वच्या सर्व म्हणजे ८ डॉक्टर आणि ३३ कर्मचा-यांच्या हजेरी स्वाक्षऱ्या होत्या. येथील प्रमुख असलेले डॉ दीपक मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ कणकवले आहेत का असे विचारता “डॉ मुंडे पुण्याला मिटींगला गेले आहेत” असे एकाने सांगितले. एवढ्यात एकमेव उपस्थित असलेले पण जेवायला गेलेले डॉ रवींद्र नखाते येथे धावतच आले. त्यांनी डॉ मुंडे आत्ताच जेवायला गेल्याचे सांगितले. यावर ‘पहिले कर्मचारी आणि तुम्ही बाहेर जा, काय बोलायचे ते ठरवा आणि मग मला नक्की सांगा’ असे मोहिते यांनी सुनावले.तसेच डॉ कणकवले यांच्याकडे चाकण रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार असल्याचे सांगितले गेले.
शासकीय खर्चातून सुसज्ज भव्य इमारत,अद्ययावत सुविधा असलेल्या चांडोली ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी(दि२३) दुपारी दोनच्या सुमाराला घडलेला हा प्रकार पाहून उपस्थित नागरिक,पत्रकार अवाक झाले. आमदार मोहिते याच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर रुग्णालयातील नर्स ,कर्मचारीही येथे जमले. मात्र प्रमुख डॉक्टर नसल्याने कोणालाच नेमकी माहिती देता येईना. शिवाय आमदार मोहितेच्या प्रश्नांचा भडीमार सुरु होताच.
बहुतेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. गरज नसताना गोर, गरीब नागरिकाना पुणे, पिंपरी-चिंचवडला जायला सांगितले जाते. अशा अनेक तक्रारींचा पाढा मोहिते यांनी वाचून उपस्थित एकमेव डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. शिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर असे वागणा-या डॉक्टरांची तक्रार आरोग्य विभागाचे उपसंचालक संजय देशमुख याच्याकडे मोबाईलद्वारे केली. सामाजिक संकट काळात बेजबाबदार व बेशिस्त वागणा-या या डॉक्टरांवर थेट कारवाई करण्याची मागणी केली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे याच्याकडे देखील कारवाईची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, करोना विषाणूमुळे देशात हाहाकार माँजला आहे. आरोग्य विभाग सतर्क आहे. मात्र येथील रुग्णालयात असलेल्या डॉक्टराना याचे गांभीर्य नाही. येथे आलेल्या रुग्णांवर उपचार केले जात नाही. त्यांना पुढे(पिंपरी येथे यशवंतराव चव्हाण रुग्णालयात) पाठविण्यात येते मग एवढे मोठे रुग्णालय कशासाठी आहे. येथील डॉक्टर केवळ पगार घेण्यापुरते येथे आहेत का? रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना सेवा मिळत नाही. राज्य सरकारने व आरोग्य विभागाने या रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराबाबत तत्काळ लक्ष घालावे. अशी मागणी केली.