तेहरान – इराणचा प्रसिद्ध कुस्तीपटू नाविद अफकारी याला अखेर फाशीवर चढविण्यात आले. दोन वर्षांपूर्वी देशात झालेल्या सरकारविरोधी आंदोलनात त्याने भाग घेतला होता.त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती व त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. नाविद याची फाशी रद्द करुन सुटका करण्यात यावी अशी मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. मात्र, त्यांच्या या आवाहनाला इराण सरकारने केराची टोपली दाखवत नाविद यांना शनिवारी फासावर चढवले.
कुस्तीपटू म्हणून नाविद अगदी थोड्या कालावधीतच देशात लोकप्रीय झाला होता. सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतल्याने या केवळ 27 वर्षांच्या कुस्तीपटूला आपला जीव गमवावा लागला. नाविदचे भाऊ वाहिद व हबीब यांना अनुक्रमे 54 व 27 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गुन्हा कबूल करण्यासाठी नाविद यांच्यावर तुरुंगात अमानुष अत्याचार करण्यात आले.
एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी नाविदला फाशी दिली असल्याचे वृत्त इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलने दिले. शिराज येथील आदिलाबाद तुरुंगात ही शिक्षा दिली. फ्रीस्टाइल व ग्रोको-रोमन प्रकारात सहभागी होणारा कुस्तीपटू असलेल्या नाविदने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने देशाला पदके जिंकून दिली होती.