तेहरान – इराणचे एफ-5 हे लढाऊ विमान रविवारी एका शाळेवर कोसळले. इराणच्या वायव्येकडील तबिझ शहरात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये दोन वैमानिकांसह एक पादचारी ठार झाला. हे विमान शाळेच्या कंपाऊंडवर कोसळले आणि कोविड-19 च्या साथीमुळे शाळा बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची जीवितहानी झाली नाही, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
तबिझ शहरातील शाहिद फकौरी एअर बेसवरून या विमानाने उड्डाण केले होते. हे लढाऊ विमान प्रशिक्षणाच्या उड्डाणावर असताना ही दुर्घटना घडली. प्रशिक्षणाचे उड्डाण संपवल्यानंतर ते परत एअर बेसकडे परतत असताना ही दुर्घटना घडली. ही शाळा शहराच्या मध्यवस्तीमध्ये आहे. हे विमान जर रहिवासी भागात कोसळले असते तर कदाचित मोठी जीवितहानी होऊ शकली असती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
इराणकडे 300 लढाऊ विमाने आहेत. त्यापैकी बहुतेक रशियन बनावटीची मिग-29 आणि सुखोई-25 आहेत. अपघात झालेले एफ-5 हे लढाऊ विमान इराणमधील शाह राजवटीतील लढाऊ विमान होते.