मुंबई – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जात आहे. अशात ज्येष्ठ नागरिकांसाठी (85 वर्षां पुढील) निवडणूक आयोगाने यंदा घरबसल्या मतदानाची सोय केली आहे. त्यासाठी निवडणूक कर्मचारी वयोवृद्ध मतदारांची माहिती गोळा केली आहे. या माहितीनुसार तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या देशात महाराष्ट्रात 85 वर्षांवरील मतदार सर्वाधिक आहेत. (voters above 85 years in Maharashtra)
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात वयोवृद्ध मतदारांची संख्या 13 लाखांच्या घरात आहे. तसेच, महाराष्ट्रातील या 13 लाख वयोवृद्धांच्या मतदानाचे ठिकाण नक्की करण्यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी मतदार याद्यांवरील पत्त्यानुसार नागरिकांची भेट घेत आहेत. ब्लॉक लेव्हलचे अधिकारी, कर्मचारी मतदार याद्यांतील पत्त्यांवर वयोवृद्ध मतदारांपर्यंत पोहचत आहेत. या मतदारांची भेट घेऊन त्यांनी घरूनच मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती देत आहेत.
यंदाच्या लोकसभेत जे घरून मतदान करणार आहेत, त्यांच्याकडून 12-ड हा वेगळा अर्ज भरून घेतला जाणार आहे. तसेच, वयोवृद्ध मतदारांनी भरलेले 12-डचे अर्ज जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केले जातील. या कार्यालयांकडून वृद्धांच्या मतदानासाठीची कार्यवाही केली जाणार आहे.
देशभरात वयोवृद्ध मतदारांची संख्या ही 81 लाख इतकी आहे. यामध्ये महाराष्ट्रात वयोवृद्ध मतदारांची संख्या 13 लाखांच्या घरात आहे. त्यानंतर सर्वात मोठे राज्य समजले जाणाऱ्या उत्तर प्रदेशात 10.4 लाख वयोवृद्ध मतदार आहेत. बिहारमध्ये 6.6 लाख मतदार आहेत. मात्र, तमिळनाडू आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये वयोवृद्ध मतदारांची संख्या सर्वात कमी आहे.
विशेष म्हणजे देशभरातील 81 लाख वयोवृद्ध मतदारांमध्ये महिला मतदार सर्वाधिक म्हणजेच 58 टक्के आहेत. त्यानुसार, 47.3 लाख महिला मतदार आहेत तर, वयोवृद्ध मतदार हे 33.8 लाख आहेत. शिवाय महाराष्ट्रातील 13 लाख वयोवृद्ध मतदारांपैकी 7.3 लाख महिला तर, 5.7 लाख पुरूष मतदार आहेत.