क्षेपणास्त्र डागले गेले ही मानवी चूक असल्याचे लष्कराकडून मान्य
तेहरान- युक्रेनचे विमान आपल्याकडून “चुकून’ पाडले गेले असल्याची कबुली इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने दिली आहे. या विमानाला एखाद्या क्षेपणास्त्राने पाडण्यात आल्याचा दावा इराणने यापूर्वी फेटाळला होता. मात्र हे विमान अनवधानाने पाडले गेले, असे आज स्पष्ट करण्यात आले. बोईंग 737 हे “शत्रू लक्ष्य’ समजण्यात होते असे सांगून सैन्याने सर्वप्रथम ही चूक मान्य केली.
युक्रेनच्या विमान पाडण्यासाठी एखाद्या क्षेपणास्त्राचा मारा कारणीभूत होण्याची लष्करी चौकशी केली जाईल, असे इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र मानवी चुकीमुळे डागले गेले आणि त्यामुळे उड्डाण केल्यानंतर अल्पावधीतच हे विमान कोसळले होते. ही एक “अक्षम्य चूक’ असल्याचे रौहानी यांनी म्हटले आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी यांनीही या दुर्घटनेमागील खरे कारण समजल्यानंतर मृतांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी सुरक्षा दलांनी आपल्या व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात असे आदेशही खामेनी यांनी दिले आहेत. गेले तीन दिवस इराणमधील अधिकारी विमान चुकून डागलेल्या क्षेपणास्त्राने पाडले गेल्याचा पाश्चात्यांचा दावा समूळ फेटाळत राहिले होते. मात्र एका क्षेपणास्त्राच्या माऱ्याने विमानाचा स्फोट झाल्याचा व्हिडीओ समोर आल्यावर या घटनेची विश्वासार्ह त्रयस्थाकडून तपासणी करण्यात यावी, या मागणीसाठी इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव यायला लागला आहे. या दुर्घटनेची जबाबदारी इराणने स्वीकारावी, असा आग्रह युक्रेन आणि कॅनडाने धरला आहे.
हे विमान युक्रेनची राजधानी किव येथे निघालेले होते. बुधवारी तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच ते कोसळले होते. या विमानातील सर्व 176 प्रवासी आणि कर्मचारी ठार झाले होते.