तेहरान : इराणमधील 52 स्थळांना टार्गेट केल्याची धमकी दिल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुटाबुटातील दहशतवादी असल्याची टीका इराणने केली आहे.
इसिस प्रमाणे, हिटलर प्रमाणे, गेंघीस प्रमाणे! त्या सर्वांची द्वेषाची संस्कृती. ट्रम्प हे सुटाबुटातील दहशतवादी आहेत. त्यांना लवकरच हा इतिहास लक्षात येईल की महान इराणी राष्ट्राला आणि संस्कृतीला कोणीही पराभूत करू शकत नाही, असे इराणचे माहिती नभोवाणी मंत्री महंमद जावेद आखरी -जाहोरमी यांनी म्हटले आहे.
सुलेमानी यांची हत्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात शुक्रवारी झाली. त्यानंतर इराणने याचा बदला घेण्याची घोषणा केली. त्यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकेने इराणमधील 52 स्थळांना टार्गेट केले जाईल, अशी धमकी दिली. त्याला इराणने हे उत्तर दिले.
इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल अब्दोलरहिम मौसावी म्हणाले, इराणशी लष्करी युध्द करण्याचे धैर्य अमेरिकेकडे नाही. भविष्यात ते युध्द करतील असे वाटत नाही. जर ते मैदानात उतरले तर आम्ही दाखवून देऊ पाच आणि दोन काय आहे.