अहमदाबाद -कोलकाता नाईट रायडर्सच्या ढिसाळ फलंदाजीची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. गुरुवारी येथे इंडियन प्रीमियर लीग सामन्यात स्टार टीम असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विजय मिळविण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न असेल.
केकेआरची फलंदाजीची समस्या सलामीच्या स्थानापासूनच सुरु होते. अत्यंत प्रतिभावान मानल्या गेलेल्या शुभमन गिलने सहा डावांत अवघ्या 89 धावा केल्या आहेत. अखेरच्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या 124 धावांचा पाठलाग करताना केकेआरच्या वरच्या फळीत कर्णधार इयान मॉर्गनसह टॉप ऑर्डर फेल गेली होती. दुसरीकडे, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांच्या गोलंदाजीने फलंदाजांना रोखणारी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
दिल्लीच्या फलंदाजीत सध्या सर्वच जण चांगले खेळत आहेत. फलंदाजीत शिखर धवन (265 धावा), पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ आणि धोकादायक ऋषभ पंत यांच्याविरूद्ध जिंकायचे असेल तर या टॉप ऑर्डरला आधी बाद करावे लागेल आणि झेल किंवा धावबादची एकही संधी गमावणे परवडणार नाही.
शुभमन गिल इथेही 15, 33, 21, 0, 11 आणि 9 अशा खराब कामगिरीचा धनी झाला आहे. मॉर्गनला गिलला समज द्यावी लागेल किंवा मग गावसकर म्हणतात त्याप्रमाणे त्याला संघातून डच्चू द्यावा लागेल. गावसकर म्हणतात की, गिलच्या जागी राहुल त्रिपाठी योग्य पर्याय राहील. तसेच मधल्या फळीत मॉर्गन, आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांच्यात प्रयोग करून पहावा लागेल.
आंद्रे रसेल आणि शिमरॉन हेटमायर हे खूपच निराश असतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अवघ्या एका धावेने झालेला पराभव त्यांना नक्कीच सलत असेल. इशांत शर्मा, कागिसो रबाडा, अवेश खान आणि अमित मिश्रासह अक्षर पटेलसमोर कोलकताच्या फलंदाजांची कसोटी लागेल, हे नक्कीच.
सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर