राज्य सरकारचा पुण्याबाबत दुजाभाव

सुविधा पुरवत नसल्याचा शहर भाजपचा आरोप

पुणे  -महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी सरकार पुणे शहराबाबत दुजाभाव करत आहे. त्यामुळेच ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्‍शन आणि कोविडच्या लसींचा शहराला अपुरा पुरवठा होत आहे. ससूनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी राज्य सरकार काम करत नाही. अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

करोनाची सद्यस्थिती आणि आगामी काळातील नियोजनाबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला अध्यक्षा अर्चना पाटील, सुशील मेंगडे यावेळी उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, “आगामी लसीकरण मोहिमेसाठी मतदार केंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावेत. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.’
खासदार बापट म्हणाले, “शहराच्या विविध भागांमध्ये महापालिकेने लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. परंतु लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आगामी लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजनाची गरज आहे. नागरिकांना लसीच्या साठ्याची पूर्वकल्पना देणे आवश्‍यक आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला, त्यांत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या नागरिकांना दुसरा डोस सहज मिळावा यासाठी योजना आवश्‍यक आहे.’

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.