उष्ण वातावरणामुळे अबुधाबीतील सामन्यांबाबत संभ्रम
दुबई – आयपीएल स्पर्धा अमिरातीत येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. मात्र, इतके कमी दिवस राहिलेले असूनही स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर का करण्यात आले नाही, अशी विचारणा केली जात होती. मात्र, स्पर्धेतील काही सामने अबुधाबीतील मैदानावर होणार असून तेथे सध्या प्रचंड उष्ण वातावरण असल्याने हे सामने तेथे खेळवावे का, असा संभ्रम निर्माण झाल्यामुळेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही मात्र, सर्व संघांशी चर्चा करून येत्या रविवारपूर्वी वेळापत्रक जाहीर केले जाईल, असा खुलासा बीसीसीआयने केला आहे.
आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी एक तासदेखील लागणार नाही. मात्र, सध्या अबुधाबीतील वातावरण सामने खेळविण्यासाठी अनुकूल नाही. तेथे प्रचंड उष्ण वातावरण असल्याने त्याचा परिणाम खेळाडूंवर होण्याची शक्यता असल्यानेच हा उशीर होत आहे. अशा वातावरणात खेळाडूंना खेळवले गेले तर त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
अमिरातीत सर्वात जास्त उष्ण वातावरण हे अबुधाबी येथे आहे. त्यामुळे अबुधाबी येथे बीसीसीआयला जास्त सामने खेळवायला आयपीएल समिती तयार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तरीदेखील येत्या दोन दिवसांत वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे बीसीसीआयने सांगितले आहे.