क्रिकेट काॅर्नर : तुषार नव्हे हुशार देशपांडे

-अमित डोंगरे

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असलेला मराठमोळा क्रिकेटपटू तुषार देशपांडे याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. खरे सांगायचे तर यंदाच्या स्पर्धेत विविध संघांकडून खेळत असलेले महाराष्ट्राचे खेळाडू चांगलेच चर्चेत आहेत. त्यात पृथ्वी शॉ, दिग्विजय देशमुख, राहुल त्रिपाठी यांच्या पाठोपाठ आता तुषारकडेही जाणकारांचे लक्ष गेले आहे.

या यादीत असलेला व गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा भाग बनलेला अजिंक्‍य रहाणे मात्र, सातत्याने अपयशी ठरत आहे. तुषारने आपल्या गुणवत्तेची दखल केवळ दिल्ली संघाच्या प्रशिक्षकांनाच नव्हे तर अन्य संघांच्या मेंटॉरलाही घ्यायला लावली आहे.

तुषारने मिळालेल्या संधीचे खरोखर सोने केले. त्याने बुधवारी दिल्लीकडून राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आयपीएल स्पर्धेचे पदार्पण साजरे केले. त्याने मध्यमगती गोलंदाजी करताना 2 बळी घेतले. बेन स्टोक्‍स व श्रेयस गोपाल या दोघांना त्याने बाद केले. यंदाच्या स्पर्धेत जे अष्टपैलु धोकादायक ठरू शकतात त्यात स्टोक्‍सचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. त्यालाच तुषारने बाद करत दिल्लीसमोरचा सर्वात मोठा अडसर दूर केला. स्टोक्‍स तेव्हा 41 धावांवर सेट होऊन खेळत असतानाच तुषारने त्याला तंबूत धाडले. राजस्थान संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज कागीसो रबाडा यानेही तुषारचे कौतुक केले आहे. तुषारकडे वेग आहे, दिशा व टप्पाही योग्य आहे.

पहिल्याच सामन्यात तुषारने दिल्लीच्या डावातील अखेरचे षटक अत्यंत भेदक टाकले. या सामन्यात राजस्थानला विजयासाठी जिंकायला 22 धावांची गरज होती. यावेळी राहुल तेवातिया स्थिरावलेला होता. मात्र, या षटकातील पहिल्या चार चेंडूंमध्ये तुषारने फक्त चारच धावा दिल्या. या षटकाच्या अखेरच्या चेंडूंवर तुषारने श्रेयसला बाद करत आपला दुसरा बळी मिळवला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एका गोलंदाजाला पदार्पणाच्या सामन्यात जे आवश्‍यक असते ते सर्व सहकार्य दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने तुषारला दिले. तुषारला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली व त्याने ही संधी दवडली नाही हीच हुशारी त्याने दाखवली.

स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये तुषारने मुंबईसाठी विविध वयोगटात सरस कामगिरी केली आहे. त्याच्या कामगिरीची दखल घेत भारताच्या अ संघातही त्याचा समावेश करण्यात आला होता. तो केवळ मध्यमगती गोलंदाजीच करतो असे नाही तर त्याने डावखुरा फलंदाज म्हणूनही स्थानिक सामन्यात आपली चुणूक दाखवलेली आहे.  रिदमीक गोलंदाज अशी ख्यातीही तुषारने मिळवली आहे. तुषार मुंबईचे रणजीपटू व भारतीय संघाचे माजी कसोटीपटू प्रवीण आम्रे यांच्याकडे शिवाजी पार्कला सराव करतो.
त्यातही त्याला पद्माकर शिवलकर व संदेश कावळे यांचेही मार्गदर्शन मिळाले होते.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या शिष्यवृत्ती योजनेचा तो फाइंड आहे. तो सराव सत्रात गोलंदाजी करताना नो-बॉल टाकत असे तेव्हा चंद्रकांत पंडित एक प्रशिक्षक म्हणून त्याला मार्गदर्शन करत होते. त्यावेळी तुषारने गोलंदाजी करताना नो-बॉल टाकू नयेत व ओव्हरस्टेपिंग होऊ नये यासाठी त्याला भीती बसावी म्हणून चक्क हातात काठी घेऊनच पंच उभे राहतात तिथे उभे राहायचे. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला व त्याचा ओव्हरस्टेपिंगचा प्रश्‍न सुटला.

कुचबिहार करंडक स्पर्धेत त्याने 21 बळी घेत आपला दर्जाही सिद्ध केला. विजय हजारे स्पर्धेतही त्याने 17 बळी घेतले. त्याने देवधर करंडक स्पर्धेत तर अत्यंत भेदक गोलंदाजी करताना 42 बळी मिळवले. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याची मुंबईच्या रणजी संघात 2016-17 साली तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात वर्णी लागली. त्यानंतर त्याचे संघातील स्थानही कायम राहिले.

आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अशीच सातत्यपूर्ण कामगिरी केली तर त्याला रणजीसह देशाच्या अ संघातही स्थान मिळेल. या व्यासपीठावरही त्याने आपल्या कामगिरीत हुशारी दाखवली तर त्याला सेकंड बेंचमधील खेळाडू बनणेही सोपे ठरेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.