66 वर्षांपूर्वी प्रभात : बारा गाड्या ओढणारी स्त्री 

ता. 17 माहे ऑक्‍टोबर सन 1954

बारा गाड्या ओढणारी स्त्री 

करमाळा, ता. 16 – येथून तीन मैलांवर असलेल्या मौजे पांडे येथील देवीची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे कालच्या पौर्णिमेस भरली होती. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे एका भाविक स्त्रीच्या अंगात देवीचा संचार होतो व मंदिराजवळ एकांस एक जोडून ठेवलेल्या बारा गाड्या त्यातील बसलेल्या माणसासह ही स्त्री एक फर्लांगपर्यंत ओढते. प्रतिवर्षी होणारा हा दैवी विक्रम पाहण्यासाठी हजारो लोक येथे जमतात.

कुत्र्याला घाबरणारा वैमानिक

पेरपिनान – उडती तबकडी आपण पाहिली एवढेच नव्हे तर या तबकडीतले वैमानिक कुत्र्याला अतिशय घाबरतात असा आपल्याला अनुभव आला असल्याचे म. सीजर्स या छपन्न वर्षे वयाच्या एका निवृत्त फ्रेंच गृहस्थाने सांगितले.

म. सीजर्सच्या घरापासून थोड्याच अंतरावर ही तबकडी येऊन थांबली आणि तीतून ड्रायव्हरसारखा वेष केलेला एक उंच इसम बाहेर आला. परंतु म. सीजर्स आणि त्यांचे दोन कुत्रे पाहताच त्याने परत आपल्या विमानात धूम ठोकली आणि क्षणार्धातच ती तबकडी वेगाने उडून नाहीशी झाली. या तबकडीच्या जमिनीवर खाणाखुणा आढळल्या नाहीत.

रॉकेलवर चालणारा रेडिओ आकाशवाणीचे संशोधन

नवी दिल्ली – आकाशवाणीच्या संशोधन विभागाने केलेल्या संशोधनांत रॉकेलच्या साध्या दिव्यावर रेडिओ चालू शकेल अशी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. या शोधामुळे रेडिओच्या विशेषतः ग्रामीण भागातील विकासास चांगलेच उत्तेजन मिळेल अशी आशा आहे. आकाशवाणीच्या संशोधन विभागाचे श्री. राम यादव यांनी ही पद्धत शोधून काढली आहे. अशा प्रकारे रॉकेलवर दररोज 3 तास याप्रमाणे रेडिओ वापरल्यास दरमहा सुमारे 3 रुपये एवढाच खर्च येईल असा अंदाज आहे.

सध्याच्या बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओंनाही खर्च याहून बराच अधिक येतो. अशाप्रकारे रॉकेलवर चालणारे रेडिओ बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओचे स्थान घेऊ शकतील अशी कल्पना आहे. कारण बॅटरीवर चालणारे रेडिओ महाग व त्यांच्या बॅटऱ्या विकत घेणे, त्या पुनः चालू करणे वगैरे गोष्टी त्रासदायक असतात. सध्या तयार करण्यात येणारे ड्राय बॅटरी सेटही या पद्धतीने वापरता येतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.