दीपक चहरसह ऋतुराज गायकवाडही बाधित
दुबई – आयपीएल स्पर्धेसाठी येथे दाखल झालेल्या चेन्नई संघातील एका गोलंदाजासह सपोर्ट स्टाफमधील बारा जणांना करोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी समोर आले होते, आता त्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड यालाही बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने चेन्नई संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
चेन्नई संघातील काही खेळाडूंनी करोनाबाबतच्या सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासल्यानेच हे घडल्याचे बोलले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरण कक्षात हलवण्यात आले असून त्यांचा विलगीकरणाचा कालावधीही वाढवण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत चेन्नईचे खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर स्थानिक व्यक्तीसोबत हात मिळवताना तसेच त्याला आलिंगन देताना दिसले. याबाबत चेन्नई संघ व्यवस्थापनाने तसेच बीसीसीआयनेही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बाधित खेळाडूंना आता 14 दिवस विलगीकरणात राहावे लागणार असून दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या दिवशी खेळाडूंची पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येईल. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.