IPL Fan Beaten Till Death: आयपीएल चाहत्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. रोहित शर्माची विकेट पडल्याचा आनंद साजरा केल्यामुळे एका वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली, या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कोल्हापुर जिल्ह्यात घडली. पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली दोन तरुणांना ताब्यात घेतले होते, मात्र वृद्धाच्या मृत्यूनंतर या प्रकरणात हत्येचे कलम 302 देखील जोडण्यात आले आहे.
बुधवारी केला हल्ला –
बंडोपंत तिबिले (वय 63) असे मृताचे नाव आहे. गेल्या बुधवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यावर बंडोपंत यांना आनंद साजरा करु लागले. हे पाहून बळवंत झांजगे (50) आणि त्यांचा भाचा सागर संतापले. त्यांनी बंडोपंत यांना शिवीगाळ व वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात त्यांनी बंडोपंत यांच्यावर हल्ला केला. दोघांनी त्यांना काठ्यांनी मारहाण केली. करवीर तालुक्यातील हणमंतवाडी गावात झालेल्या मारामारीदरम्यान दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी आरोप करण्यात आले. जखमी बंडोपंत यांच्या कुटुंबीयांनी त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.
63-year-old CSK fan beaten to death in Kolhapur for celebrating Rohit Sharma’s wicket in IPL 2024https://t.co/XqWSgESOPy
— Sports Lab (@SportsLab18) April 1, 2024
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू –
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केल्याचे करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. सुरुवातीला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र शनिवारी रात्री उशिरा बंडोपंत यांचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणात हत्येचे कलम जोडण्यात आले आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
नेमकं कशावरु झालं भांडण ?
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर बंडोपंत आणि आरोपीमध्ये वाद झाला. आरोपी म्हणाले की, रोहित आऊट झाला म्हणून काय झालं, सामना मुंबईच जिंकेल. पण बंडोपंत म्हणाले, की भिंत तर तुटली, आता गड कसा वाचवणार? हे ऐकून आरोपी संतापले. आणि झालेल्या मारहाणीतून बंडोपंत यांचा अखेर मृत्यू झाला. किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा नाहक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.