Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. याशिवाय त्याने क्षेत्ररक्षणातही मोठा विक्रम केला.
विराट कोहलीने होळीच्या दिवशी (IPL 2024) धावांचा वर्षाव केला. पंजाब किंग्जविरुद्ध सोमवारी (25 मार्च) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने 49 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. पंजाबविरुद्धच्या या खेळीने कोहलीने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
सर्वप्रथम कोहलीने शिखर धवन याला मागे टाकत आयपीएलमधील 51 वे अर्धशतक झळकावले. त्याने धवनचा संघ पंजाबविरुद्धच ही कामगिरी केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे, ज्याने 61 वेळा ही कामगिरी केली आहे.
पंजाबविरुद्ध खेळलेल्या 77 धावांच्या खेळीसाठी कोहलीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला. या ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारासह त्याने महेंद्रसिंगची बरोबरी केली. कोहलीने 17वा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ जिंकला. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 17 वेळा ही कामगिरी केली आहे.
फलंदाजीसोबतच कोहलीने क्षेत्ररक्षणातही कमाल केली. कोहलीने 2 झेल घेतले, ज्यासह त्याने माजी भारतीय क्रिकेटर आणि मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाचा विक्रम मोडला. कोहलीने आपल्या T20 कारकिर्दीत 174 झेल पूर्ण केले. तो T20 मध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू ठरला. रैना 172 झेलांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.