Indian Premier League 2024 Live Cricket Score, SRH vs MI : ट्रॅव्हिस हेडने आयपीएलच्या आठव्या सामन्यात मुंबईविरूध्दच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना 24 चेंडूत 9 चौकार अन् 3 षटकारासह 62 धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजी पाहुन अस जाणवलं की, त्यानं 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावले होते तिथूनच पुढे आज फलंदाजीस सुरुवात केली आहे.
वास्तविक, हेड आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. स्पर्धेच्या 8व्या सामन्यात, मुंबई इंडियन्स विरुद्ध, हेडने शानदार फलंदाजी करत अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावले. तत्पूर्वी, हेड केवळ 5 धावांवर असताना त्याचा झेल सुटला, ही मुंबईसाठी मोठी चूक ठरली. ( Travis Head Dropped Catch ) त्याच्या खेळीमुळे हैदराबाद संघानं मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केली आहे. हार्दिकने टाकलेल्या दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवर हेडला झेलबाद करण्याची संधी चालून आली होती. मात्र ही संधी टीम डेव्हिडने गमावली. झेल फार सोप्पा नव्हता. मात्र हेडसारख्या घातक फलंदाजाचा झेल घेणं अपेक्षित होतं
हेडने 18 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. हेडच्या स्फोटक फलंदाजीमुळे हैदराबादने पॉवर प्लेमध्ये 1 गडी गमावून 81 धावा केल्या. यानंतर 8व्या षटकात जेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर झेलबाद होऊन हेड पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 24 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. हेडची विकेट पडली तेव्हा हैदराबादने 7.5 षटकांत 113 धावसंख्येपर्यत मजल मारली होती.
दुसऱ्या षटकातच सुटला झेल…
दरम्यान, ट्रॅव्हिस हेडचा ( Travis Head ) डावाच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर झेल सुटला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या हे षटक टाकत होता. या झेलनंतर ट्रॅव्हिस हेडने जे केले ते मुंबईसाठी दुःखद स्वप्नापेक्षा कमी नसेल. झेल चुकवल्यानंतर हेडने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली. हेडच्या स्फोटक खेळीच्या जोरावर हैदराबादने अवघ्या 7व्या षटकात 100 धावसंख्या गाठली.
अभिषेक शर्माने 16 चेंडूतच केले अर्धशतक…
हेडने काही काळापूर्वी 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते, तर अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान अभिषेकने 2 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई नाही, तर तो त्यांच्यासोबत खेळला. हेडने सुरू केलेली फटकेबाजी अभिषेकने पुढे सुरू ठेवली असंच म्हणावं लागले.