IPL 2024 ( GT vs DC Match 40, Mohit Sharma ) : आयपीएल 2024 मधील 40 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीने हा सामना 4 धावांनी जिंकला. दिल्लीचा या मोसमातील हा चौथा विजय आहे. गुजरातचा हा चौथा पराभव आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने शानदार फलंदाजी सादर केली. पंतने गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माही यातून सुटला नाही. विशेषत: शेवटच्या षटकात मोहितची जोरदार धुलाई झाली.
मोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम…
मोहित शर्माच्या शेवटच्या षटकात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतची जोरदार स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. या षटकात मोहितने 31 धावा दिल्या होत्या. पंतने या षटकात सलग तीन षटकारही मारले. या सामन्यात मोहितने गोलंदाजी करताना 4 षटकात 73 धावा दिल्या, तर त्याला एकही विकेट मिळाली नाही. यासह आयपीएलमध्ये मोहितच्या नावावर एक अतिशय लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा मोहित पहिला गोलंदाज ठरला आहे.
Vintage Rishabh Pant™ 💙❤ pic.twitter.com/k8DlSI1S8B
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 24, 2024
दिल्लीविरूध्द मोहितची कामगिरी…
पहिले षटक- 12 धावा
दुसरे ओव्हर- 16 धावा
तिसरे षटक- 14 धावा
चौथे षटक- 31 धावा
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांची यादी…
बासिल थम्पी (SRH vs RCB, IPL 2018) : 4 षटक 70 धावा
यश दयाल (GT vs KKR, IPL 2023) : 4 षटक 69 धावा
रीस टॉप्ले (RCB vs SRH, IPL 2024) : 4 षटक 68 धावा
आयपीएल 2018 मध्ये, बासिल थम्पीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध 70 धावा दिल्या होत्या. मात्र आता मोहित शर्माने बासिल थम्पी थम्पीला मागे टाकले आहे. त्याचबरोबर या यादीत मोहित शर्मा आणि बासिल थंपी यांच्यानंतर यश दयाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी यश दयालच्या स्पेलमध्ये 69 धावा केल्या होत्या. त्या सामन्याच्या शेवटच्या षटकात रिंकू सिंगने सलग 5 षटकारांसह 31 धावा केल्या होत्या. यानंतर रीस टॉप्ले चौथ्या स्थानावर आहे. आयपीएल 2024 मध्ये रीस टॉप्लेने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याच्या स्पेलमध्ये 68 धावा दिल्या.
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमावून 224 धावा केल्या. दिल्लीकडून ऋषभ पंतने सर्वाधिक88 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्स संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 220 धावा करू शकला.