Leopard Attack On Guy Whittall : झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय व्हिटलवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात गाय व्हिटल गंभीर जखमी झाला आहे. मात्र, कसा तरी गाय व्हिटल याचा जीव वाचला. गाय व्हिटलच्या पत्नीने या घटनेबाबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच आपल्या पाळीव कुत्रा आणि लोकांच्या मदतीने गाय व्हिटलने त्याचा जीव वाचवण्यात यश मिळवले असल्याचेही सांगितले.
कॉन्झर्व्हन्सीमधून ट्रेकिंग करत असताना बिबट्याने हल्ला केला. दरम्यान, व्हिटलची वन्य प्राण्याशी सामना होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सप्टेंबर 2013 मध्ये गाय व्हिटलच्या पलंगाखाली 8 फूट लांब मगर आली होती, तो ज्या पलंगावर झोपला होता त्याच पलंगाखाली ही मगर रात्रभर पडून होती. मात्र, आता गाय व्हिटलचा जीव बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे.
घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल..
गाय व्हिटलच्या पत्नीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये गाय व्हिटल हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेले दिसत आहे. तसेच संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले दिसत आहे. गाय व्हिटलची पत्नी हन्ना स्टोक्स हिने पोस्टद्वारे सांगितले की, बिबट्याने हल्ला केला, पण कसा तरी त्याचा जीव वाचवण्यात यश आले.
माजी क्रिकेटरची पत्नी हन्ना माहिती देताना म्हणाली की, आम्ही खूप भाग्यवान आहोत की लोकांनी वेळेत आमचे प्राण वाचवले. कर्मचाऱ्यांनी त्याला हिप्पो क्लिनिकमध्ये दाखल केले. त्यानंतर व्हिटलला गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी मिल्टन पार्क रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे माजी क्रिकेटपटूवर शस्त्रक्रिया करावी लागली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिटल हा झिम्बाब्वेमध्ये सफारीचा व्यवसाय चालवतो आणि हुमनी येथील कॉन्झर्व्हन्सीमधून ट्रेकिंग करत असताना याचदरम्यान त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. मात्र, रक्ताने माखलेला गाय व्हिटलचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया त्याचे चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी सतत शुभेच्छा देत आहेत.
IPL Playoffs Scenario 2024 : राजस्थानला केवळ एका विजयाची गरज, तर ‘या’ संघांना प्लेऑफ गाठणे कठीण….
अशी होती गाय व्हिटलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द….
गाय व्हिटलने झिम्बाब्वेसाठी 1993 मध्ये पदार्पण केले होते, तर 2003 मध्ये तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 46 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त या खेळाडूने 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. गाय व्हिटलच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये द्विशतक आहे. या फलंदाजाने कसोटीत 2207 धावा केल्या, तर गाय व्हिटलच्या नावावर एकदिवसीय प्रकारात 2705 धावा आहेत. गाय व्हिटलने कसोटी फॉर्मेटमध्ये 4 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला. एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावण्यात तो अपयशी ठरला असताना त्याने 11 वेळा अर्धशतकांचा टप्पा ओलांडला आहे.