बंगळुरु -ग्लेन मॅक्सवेल व फाफ डुप्लेसी यांच्या आक्रमक फलंदाजीनंतर हर्षल पटेलने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या बळींच्या जोरावर रॉ.ल चॅलेंजर बंगळुरुने आयपीएल स्पर्धे रविवारी राजस्थान रॉयल्सवर 7 धावांनी विजय मिळवला. बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली.
आक्रमक सलामीवीर फलंदाज जोस बटलर पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वालने देवदत्त पडीक्कलसह 98 धावांची भागीदारी करताना डाव सावरला. पडीक्कलने अर्धशतक थाटात पूर्ण केले मात्र, त्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 52 धावांच्या खेळीत 34 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार फटकावला.
जयस्वालने सॅमसनसह संघाचे शतक फलकावर लावले मात्र, जयस्वाल वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात 47 धावांवर बाद झाला. त्याने 37 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार फटकावले. पाठोपाठ सॅमसनही 22 धावा करुन परतला. त्याने 15 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर शेमरन हेटमायरही धावबाद झाला.
ध्रुव जुरल व रवीचंद्रन अश्विनने निकराचे प्रयत्न केले मात्र, अश्विनही 12 धावांवर बाद झाला व त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही. जुरल 16 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांसह 34 धावांवर नाबाद राहिला. अब्दुल बासीत 1 धाव काढून नाबाद राहिला. बंगळुरूकडून हर्षल पटेलने 3 गडी बाद केले.
तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननेन नाणेफेक जिंकत बंगळुरुला पहिल्यांदा फलंदाजी दिली. या सामन्यात बंगळुरूची सुरुवातच निराशाजनक झाली. कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. पाठोपाठ शाहबाद अहमदही परतला. यावेळी 2 बाद 12 अशा स्थितीतून फाफ डुप्लेसी व ग्लेन मॅक्सवेल यांनी शतकी भागीदारी केली. या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली.
मॅक्सवेल 77 तर डुप्लेसी 62 धावांवर बाद झाल्यावर दिनेश कार्तिकच्या 16 धावांचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत टीच्चून गोलंदाजी केल्यानंतरही बंगळुरुने 9 गडी गमावून 189 धावा केल्या. राजस्थानकडून ट्रेन्स बोल्ट व संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. रवीचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर बंगळुरु – 20 षटकांत 9 बाद 189 धावा. (ग्लेन मॅक्सवेल 77, फाफ डुप्लेसी 62, दीनेश कार्तिक 16, ट्रेन्ट बोल्ट 2-41, संदीप शर्मा 2-49, यजुवेंद्र चहल 1-28, रवीचंद्रन अश्विन 1-36). राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 6 बाद 182 धावा. (देवदत्त पडीक्कल 52, यशस्वी जयस्वाल 47, संजू सॅमसन 22, ध्रुव जुरल नाबाद 34, हर्षल पटेल 3-32).