पुणे : ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स याने फेब्रुवारीमध्ये बेंगळुरू येथे होणाऱ्या आयपीएल २०२२ च्या लिलावासाठी उपलब्ध असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. यंदाच्या हंगामासाठी दोन नवीन संघांचा समावेश झाल्याने हा लिलाव अधिक मोठा आणि रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.
आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता कमिन्स स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी झाला नव्हता. गेल्या मोसमात खेळलेल्या सात सामन्यांमध्ये कमिन्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ३४ चेंडूत ६६ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. 28 वर्षीय खेळाडूने प्रति षटक 8.83 या इकॉनॉमी रेटने नऊ बळी घेतले होते.
वेगवान गोलंदाजीसह आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता असलेल्यामुळे कमिन्सला आपल्या संघात सहभागी करुन घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स, पंजाब किंग्स आणि रॉजय चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.
१) चेन्नई सुपर किंग्स
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स अनुभवी खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करण्यासाठी ओळखला जातो. महत्त्वपूर्ण अनुभव आणि खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये योगदान देण्याची क्षमतेमुळे कमिन्स चेन्नईसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरु शकतो.
तो नवीन चेंडूने आणि शेवटच्या महत्वपूर्ण षटकांमध्येही गोलंदाजी करू शकतो, तसेच खालच्या फळीत फलंदाजीत मोठे योगदान देऊ शकतो. कमिन्स हा एक चपळ क्षेत्ररक्षक देखील आहे, जे खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अत्यंत मौल्यवान असते.
जर चेन्नई आयपीएल २०२२ च्या लिलावात सॅम करणला पुन्हा करारबद्ध करु शकले नाहीत, तर ऑसी सुपरस्टार चेन्नईसाठी मोठा पर्याय ठरु शकतो.
2) पंजाब किंग्स
संघाची पुन्हा नव्याने बांधनी करण्यासाठी सज्ज असलेल्या पंजाब किंग्जला त्यांच्याकडे दर्जेदार विदेशी गोलंदाज नसल्यामुळे अनेकवेळा संघर्ष करावा लागला आहे. फलकावर मोठी धावसंख्या जमा करुनही, त्यांचे गोलंदाज त्याचा बचाव करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पॅट कमिन्ससारखा तगड्या गोलंदाजाला करारबद्ध करण्यासाठी पंजाब उत्सुक असेल.
यंदाच्या हंगामात कर्णधार केएल राहुलल पंजाबकडे नसल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा अनुभव असलेला पॅट कमिन्स पंजाबसाठी कर्णधार म्हणून पर्याय ठरु शकतो. त्यामुळे जर पंजाबने कमिन्ससाठी मोठी रक्कम खर्च केली तरी आश्चर्य वाटणार नाही.
3) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
गेल्या काही दिवसांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नजर पॅट कमिन्सवर आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने 15.5 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध करण्यापूर्वी बंगळुरुने 15.2 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. त्यामुळे आयपीएल 2022 च्या लिलावात त्यांनी पुन्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर मोठी बोली लावली तरी आश्चर्य वाटणार नाही.
कमिन्सला भारतात खेळण्याचा चांगला अनुभव आहे जो चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना बंगळुरुसाठी उपयोगी पडेल. त्यामुळे आपल्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या शोधात असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कमिन्सला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेण्यासाठी मोठी बोली लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.