IPL 2021 : स्टार्सची गच्छंती, नवोदितांना संधी

IPL 2021 | संघ मालकांची यादी तयार, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना फटका

नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठी खेळाडू मुक्‍ती तसेच अदलाबदलीबाबतची यादी सर्व संघांनी तयार केली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये नावाजले गेलेल्या स्टार खेळाडूंची विविध संघमालकांनी गच्छंती केली असून त्याचा सर्वात जास्त फटका ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना बसला आहे.
भारताविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत पराभूत झालेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंना त्यांच्या संघांनी बाहेरचा रस्ता दाखवला असून नवोदित खेळाडूंवरच विश्‍वास ठेवला गेल्याचे समोर आले आहे.

स्टीव्ह स्मिथ, ऍरन फिंच, ग्लेन मॅक्‍सवेल या ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंची त्यांच्या संघांनी हकालपट्टी केली आहे. याशिवाय लसिथ मलिंगा, हरभजन सिंग व केदार जाधव या अनुभवी खेळाडूंनासुद्धा अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने वगळले आहे.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेला एप्रिल महिन्यात सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी पुढील महिन्यात खेळाडूंची लिलावप्रक्रिया होणार आहे. या लिलाव प्रक्रियेपूर्वी आठही संघांनी त्यांच्याकडे कायम राखण्यात आलेल्या तसेच वगळण्यात आलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर केली आहे. आता आयपीएल प्रशासकीय समिती त्याचा अभ्यास केल्यावर लिलावात त्यांच्या नावावरही बोली लागण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे.

स्मिथला राजस्थान रॉयल्सने डच्चू दिल्यामुळे संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे सोपवण्यात आले आहे. गेल्या वर्षी अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्मिथ अपयशी ठरला होता. त्याच्या नेतृत्वाखालील राजस्थानला बाद फेरीही गाठता आली नव्हती. तसेच नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत स्मिथच्या वर्तनावरही सातत्याने टीका झाल्याने अशा खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्‍सवेल व वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मॅक्‍सवेलला गेल्या स्पर्धेत एकाही सामन्यात भरीव कामगिरी करता आलेली नव्हती.

संपूर्ण स्पर्धेत या वादळी फलंदाजाला एकही षटकार फटकावता आलेला नव्हता. त्यामुळेच त्याला संघातून बाहेर काढण्यात आले आहे. मुंबईच्या चार विजेतेपदांत मोलाची भूमिका बजावणाऱ्या श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने दुखापतीमुळे संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या हंगामातून माघार घेतली होती. परंतु आता मुंबईने त्याला संघात स्थान दिलेले नाही. मलिंगाव्यतिरिक्त जेम्स पॅटिन्सन, नाथन कुल्टरनाइल या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनासुद्धा मुंबईने वगळले आहे.

तीन वेळच्या विजेत्या चेन्नईने अपेक्षेप्रमाणे केदार जाधव, पियूष चावला, मुरली विजय यांना डच्चू दिला असला तरी गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुरेश रैनाला संघात कायम राखले आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रैना सर्वात जास्त यशस्वी ठरलेला खेळाडू असल्याने चेन्नई संघाने त्याचे संघातील स्थान मात्र, कायम ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर बेंगळूरुने फिंच, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन या परदेशी खेळाडूंसह शिवम दुबे, उमेश यादव, पवन नेगी या भारतीय खेळाडूंनाही संघातून बाहेर काढले आहे.

विविध संघांनी डच्चू दिलेले स्टार खेळाडू 

मुंबई इंडियन्स – लसिथ मलिंगा, नाथल कुल्टरनाइल, जेम्स पॅटिन्सन, शर्फेन रुदरफोर्ड, मिचेल मॅक्‍लेनेघन, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय.
चेन्नई सुपर किंग्ज – मुरली विजय, केदार जाधव, पियूष चावला, हरभजन सिंग, मोनू सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु – ऍरन फिंच, डेल स्टेन, ख्रिस मॉरिस, मोईन अली, शिवम दुबे, उमेश यादव, इसुरू उदाना, पवन नेगी, गुरुकीरातसिंग मान.
दिल्ली कॅपिटल्स – अलेक्‍स केरी, जेसन रॉय, संदीप लामिच्छाने, तुषार देशपांडे.
सनरायजर्स हैदराबाद – बिली स्टॅनलेक, फॅबियन ऍरलन, संजय यादव, बी. संदीप, यारा पृथ्वीराज.
राजस्थान रॉयल्स – स्टीव्ह स्मिथ, टॉम कुरेन, ओशेन थॉमस, अंकित राजपूत, वरुण अरॉन, आकाश सिंग, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंग.
किंग्ज इलेव्हन पंजाब – ग्लेन मॅक्‍सवेल, शेल्डन कॉट्रेल, जिमी निशाम, मुजीब उर रहमान, हार्डस विल्जोएन, कृष्णप्पा गौतम, करुण नायर, जगदीश सुचित, तेजिंदर सिंग.
कोलकाता नाइट रायडर्स –निखिल नाईक, सिद्धेश लाड, एम सिद्धार्थ, टॉम बॅन्टन, ख्रिस ग्रीन, हॅरी गर्नी.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.