Ajinkya Rahane : चाहत्यांचा पाठिंब्यामुळेच यश मिळाले

Ajinkya Rahane | ढोल-ताशा व टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचे जंगी स्वागत                                                   ( Ajinkya Rahane Gets Grand Welcome on arrival in Mumbai ) 

ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात मालिका विजय साकार करण्याची ऐतिहासिक कामिगरी केल्यानंतर भारताचा बदली कर्णधार अजिंक्‍य रहाणे याने चाहत्यांचा पाठिंबा आणि विश्‍वासामुळेच हे यश मिळवू शकलो, अशी भावना व्यक्‍त केली.

ऍडलेडच्या पहिल्या कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतरही भारतीय संघाने सांघिक खेळ करत दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी राखली. तिसरा सामना अनिर्णित राखला आणि चौथा जिंकत 2-1 असा मालिका विजय मिळविला. चाहत्यांनी दाखवलेला विश्‍वास सतत आम्हाला सरस कामगिरी करण्यासाठी प्रेरित करत होता. त्यांच्यामुळेच हे यश मिळाले. ऐतिहासिक कामगिरी आहे आणि यशही लाख मोलाचे आहे. असंख्य अडचणीतून आम्ही हे यश मिळविले. विलगीकरणाच्या खडतर प्रक्रियेतून जात असताना आमच्या मानसिकतेचाही कस लागत होता. एकामागून एक खेळाडू जखमी होत होते. एकवेळ अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचे देखील आव्हान होते. अशा वेळी खेळाडूंनी दाखवलेली जिद्द आणि निर्धार खूप महत्त्वाचा होता, असेही त्याने सांगितले.

विलगीकरणाच्या खडतर प्रक्रियेतून जात असताना भारतीय खेळाडूंनी आपली मानसिकता ढळू दिली नाही. विलगीकरणाचे नियम आणि अटी पाहिले तर हे केवळ अशक्‍यच होते, असेही रहाणे म्हणाला.
ऑस्ट्रेलियाला नमवत भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका 2-1 जिंकली. या अविस्मरणीय विजयानंतर भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला. संघ प्रशिक्षक रवि शास्त्री, अजिंक्‍य रहाणे, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबई विमानतळावर उतरले. हा क्षण एखाद्या सोहळ्यासारखा होता. मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे रहाणेसह सर्वच खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट अशा प्रफुल्लित वातावरणात हे खेळाडूदेखील भारावून गेले.

विलगीकरण नाहीच

परदेशातून येत असल्याना करोनाच्या नियमानुसार विलगीकरणात राहावे लागते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून खेळाडूंना विलगीकरणातून सूट देण्याबाबत चर्चा केली व त्यानंतर खेळाडूंना थेट घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पुढचे सामने चेन्नईला होणार आहेत. त्याआधी खेळाडूंना कुटुंबासमवेत काही वेळ घालवायचा होता. मात्र, परदेशातून आल्यामुळे नियमानुसार त्यांना विलगीकरणात राहावे लागले असते. पवार यांच्या पुढाकारामुळे खेळाडूंना दिलासा मिळाला व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्यांना आपल्या कुटुंबीयांसमवेत वेळ घालवता येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.