IPL 2021 : शाहबाज अहमदचा भेदक मारा; हैद्राबादविरुद्ध कोहली ब्रिगेडचा रोमांचक विजय

चेन्नई – ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक आणि शाहबाझ अहमदने एका षटकांत  घेतलेल्या तीन विकेटच्या जोरावर विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैद्राबादविरुद्ध ६ धावांनी रोमांचक विजय मिळवला. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तर सनरायजर्स हैद्राबाद संघाला २० षटकांत ९ बाद १४३ धावांपर्यंतच मजल मारता आली.  

विजयासाठी १५० धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैद्राबाद संघाचा वृद्धीमान साहा (१) झटपट बाद झाला. मात्र डेव्हीड वॉर्नर आणि मनिष पांडे यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी ८३ धावांची भागीदारी रचली. कर्णधार डेव्हीड वॉर्नर 37 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकारासह 54 धावा करून बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो (१२), अब्दुल समद (०), विजय शंकर (३) एकापाठोपाठ तंबूत परतले. तर मनिष पांडे देखील 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेले जेसन होल्डर (४) आणि राशिद खान (१७) संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.  त्यामुळे हैद्राबाद संघाला १४३ धावांपर्यंतच मजल मारता आली. 

शाहबाझ अहमदने तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर काईल जेमीनसने एक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.

तत्पूर्वी नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या बेंगळुरूची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर देवदत्त पडीक्कल ११ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या शाहबाझ अहमदने विराट कोहलीच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलसोबत कोहलीने ४४ धावांची भागीदारी केली. परंतु, जेसन होल्डरच्या चेंडूवर कोहली (३३) बाद झाला. मॅक्सवेलने एकाकी झुंज देत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४१ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावा केल्या. मात्र दुसऱ्या बाजूने एबी डीव्हीलीयर्स (१), वॉशिंग्टन सुंदर (८), डॅन क्रिस्टीयन (१) आणि काईल जेमीसन (१२) धावा करून बाद झाले. तर अखेरच्या चेंडूवर जेसन होल्डरने मॅक्सवेलला बाद केलं.

बेंगळुरूकडून जेसन होल्डरने तीन, राशीद खानने दोन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, शाहबाझ नदीम, आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.