गुंतवणुकीचे धडे क्रिकेटच्या भाषेत! (भाग-१)

क्रिकेटमधून गुंतवणुकीचे धडे म्हटल्यावर वाचकांच्या भुवया उंचावल्या जाण्याची शक्यता आहे. परंतु गुंतवणुकीचे धडे समजायला अवघड, गुंतागुंतीचे किंवा गूढ काहीतरी, असे नसते. आर्थिक विषयात रस असलेल्यांनाच ते जमते असेही नाही. खरे तर आयुष्यातील अनुभवांतून आणि शिक्षणाच्या विविध शाखांमधील ज्ञानाचा व्यावहारिक वापर करून चांगल्या प्रकारे गुंतवणूक करता येते. त्यातूनच वकील, डॉक्टर, प्राध्यापक, अभियंते असे व्यावसायिक यशस्वी गुंतवणूकदार झाल्याचे पाहायला मिळते. केवळ क्रिकेटच नव्हे तर अन्य खेळ, माध्यमांचे कामकाज, राजकारण अशा क्षेत्रातूनही गुंतवणुकीचे धडे मिळत असतात. भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. भारतात क्रिकेट ही अब्जावधी डॉलरची इंडस्ट्री बनली आहे. इंडियन प्रीमियर क्रिकेट लीग शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे. अगदी खेळपट्टीच्या स्थितीपासून ते संघाची निवड आणि निवड समितीतील सदस्य याविषयी प्रत्येकजण अधिकाराने बोलत असतो. बहुतेकांना क्रिकेटची भाषा कळते म्हणून क्रिकेटच्या भाषेत समजावून घेऊन यशस्वी गुंतवणूकदार कसे व्हायचे?

क्रिकेट आणि गुंतवणूक यामध्ये खरचं काही साम्य आहे का? होय, निश्चितच. पुढील बाबींचा विचार करा. – नियोजन, धोरण, उद्दीष्ट ठरवणे, बदलत्या परिस्थितीनुसार त्वरीत निर्णय घेणे अशा अनेक गोष्टींमध्ये साम्य आढळते. गुंतवणुकीबाबत प्रक्रिया ठरवताना जसा विचार केला जातो तसाच विचार क्रिकेटचा खेळ सुरु होण्याआधी केला जातो.

खेळपट्टी आणि एकंदरीत हवामानावरून चेंडू कसा वळणार, उसळणार, खाली राहणार की स्लो येणार या सगळ्याचा अंदाज बांधला जात असतो. काही मैदानात तर यावरून सामन्याचा निकाल ठरत असतो. त्याचप्रमाणे गुंतवणूक करताना देशातील आर्थिक आघाडीवरील हवामान, जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडी, उद्योगातील वाटचाल इत्यादी बाबींचा बाजारपेठेवर एकत्रित परिणाम होत असतो. उदाहरणार्थ महागाई वाढली की लोकांची खरेदी करण्याची शक्ती कमी होते. त्याचा परिणाम दैनंदिन गरजांच्या वस्तू खरेदीवर म्हणजेच आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर या सारख्या कंपन्यांच्या शेअरच्य किंमतीवर होतो. असे असले तरी या कंपन्यांची एफएमसीजी (फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुडस्) उत्पादनांची मागणी कायम राहते. कारण ती उत्पादने सर्वसामान्यांच्या रोजच्या गरजांमधील असतात. म्हणजेच या क्षेत्राच्या वाढीचा वेग कमी होतो. काही वेळा तो उणे होतो. त्यामुळे कुठल्या कंपनीचे शेअर घ्यायचे याची निवड करताना अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घ्यावी लागते. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर भारतातील खेळपट्ट्या पाटा असतात. त्यामुळे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरतात. त्यांनी टाकलेले चेंडू चांगल्या प्रकारे वळतात. याउलट परदेशातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पूरक असतात. त्यामुळे चेंडूला चांगला वेग, टप्पा पडल्यानंतरची उंची आणि स्विंग मिळतो.

गुंतवणुकीचे धडे क्रिकेटच्या भाषेत! (भाग-२)

गुंतवणुकीचे धडे क्रिकेटच्या भाषेत! (भाग-३)

क्रिकेट आणि गुंतवणुकीतील बारीक साम्यस्थळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.