त्यामुळेच 23 जून हा दिवस दरवर्षी ‘ऑलिम्पिक डे’ म्हणून साजरा करतात !

पुणे – आधुनिक ऑलिम्पिकचे जनक मानले जाणाऱ्या पिएर द कुबेर्तान यांच्या प्रयत्नांतूनच फ्रान्समध्ये 23 जून 1894 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ची स्थापना झाली होती .पुढे दोनच वर्षांत ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आले.ते म्हणतात,’ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवणं नाही, तर सहभाग घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे, आयुष्यात जिंकणं नाही, तर लढणं सर्वात महत्त्वाचं आहे. या विधानात खेळांचंच नाही, तर जगण्याचं सूत्रही सामावलं आहे. त्यामुळेच 23 जून हा दिवस दरवर्षी ‘ऑलिम्पिक डे’ म्हणून साजरा केला जातो.

दरम्यान, कोरोना संसर्गामुळे टोकियो ऑलिम्पिक 2020 एक वर्ष लांबणीवर पडले, मात्र यंदाच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा पुढील महिन्यात 23 जुलैला सुरू होणार आहे. यंदाचा ‘ऑलिम्पिक डे’ आणखी खास आहे, कारण यानंतर बरोबर एक महिन्यानं, 23 जुलै 2021 रोजी, टोकियो ऑलिम्पिकची सुरुवात होणार आहे.

ऑलिम्पिक डे म्हणजे काय?

ऑलिम्पिक ही केवळ एक क्रीडास्पर्धा नसून खेळाचा प्रसार करणारी आणि त्यातून लोकांना एकत्र आणणारी एक मोठी विश्वव्यापी चळवळ आहे. चळवळीचं हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वर्षातला एक दिवस ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जावा, असा प्रस्ताव पहिल्यांदा 1947 साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतले चेकोस्लोवाकियाचे प्रतिनिधी डॉक्टर ग्रुस यांनी मांडला.
वय, वर्ण, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी काहीही असो, सगळ्यांनाच म्हणजे अगदी अजिबात कोणताही खेळ न खेळणाऱ्या व्यक्तींनाही यात सहभाग घेता यावा, ही अपेक्षा ठेवली जाते.

प्राचीन ऑलिम्पिक
ऑलिम्पिक समितीची स्थापना सव्वाशे वर्षांपूर्वी झाली होती, पण ऑलिम्पिकचा इतिहास बराच जुना आहे. प्राचीन ग्रीसमध्ये इसवीसनपूर्व आठव्या शतकात म्हणजे सुमारे 2,700 वर्षांपूर्वी या क्रीडास्पर्धांची सुरुवात झाली होती. सुमारे 50,000 जण त्या खेळांसाठी हजेरी लावायचे, असे उल्लेख इतिहासात आहेत.
ऑलिम्पिकच्या काळात ‘पवित्र युद्धबंदी’ लागू केली जायची. खेळाडू आणि प्रेक्षक ऑलिम्पियाला जाऊन सुखरूपपणे परत येऊ शकतील, यासाठी ही युद्धबंदी व्हायची. ऑलिम्पिक स्पर्धा हे तेव्हापासूनच शांतीचं प्रतीक मानलं जातं.

पहिले ऑलिम्पिक खेळ

-एप्रिल 1896 मध्ये अथेन्सच्या पॅनाथेनिक स्टेडियममध्ये पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक खेळांचं आयोजन
– त्यावेळी 43 क्रीडाप्रकारांमध्ये फक्त 14 देशांचे जेमतेम 200 पुरुष खेळाडू सहभागी
– टेनिस, ट्रॅक अँड फिल्ड, फेन्सिंग, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, कुस्ती, नेमबाजी, जलतरण आणि जिमनॅस्टिक्सचा समावेश
.- क्रिकेट आणि फुटबॉललाही त्या स्पर्धेत स्थान मिळालं होतं, पण पुरेशा खेळाडूंअभावी ते रद्द

त्यानतंर पुढच्या 125 वर्षांत या क्रीडास्पर्धेनं बरेच चढउतार पाहिले आहेत, लोकांना खेळावर प्रेम करायला शिकवलं आहे आणि त्यांना संकटकाळात प्रेरणा दिली आहे.

असे असणार टोकियो ऑलिम्पिक

– 2021 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा जपानची राजधानी टोकियोमध्ये 23 जुलै चे 8 ऑगस्ट दरम्यान होणार
– पॅराऑलिम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर होणार
– या ऑलिम्पिकमध्ये 33 स्पर्धा आणि 339 इव्हेंट्स 42 ठिकाणी या स्पर्धा
– पॅराऑलिम्पिकमध्ये एकूण 22 खेळांचे 539 इव्हेंट्स, 21 ठिकाणी या स्पर्धा
– ग्रेटर टोकियोमध्येच यातल्या बहुतेक स्पर्धा आणि कार्यक्रम होणार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.