नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय विमान सेवा 15 जुलैपर्यंत स्थगित राहणार आहे. त्याविषयीचा निर्णय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शुक्रवारी जाहीर केला. अर्थात, डीजीसीएची मंजुरी असणाऱ्या काही निवडक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय सेवा सुरू ठेवली जाणार आहे.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या आणि भारतातूून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या सेवेवरील स्थगिती आणखी काही दिवस कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. करोना संकट ध्यानात घेऊन भारताने 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा थांबवली. त्यानंतर 6 मेपासून भारताने वंदे भारत अभियान सुरू केले. त्याअंतर्गत परदेशांत अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांची व्यवस्था करण्यात आली.
त्याशिवाय, भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांनाही मायदेशी जाण्याची परवानगी देण्यात आली. दोन महिन्यांच्या खंडानंतर भारतात विमानांची देशांतर्गत प्रवासी वाहतूकही 25 मेपासून सुरू करण्यात आली. ती देशांतर्गत सेवा सुरूच राहणार आहे.
देशातील वाढत्या करोनाबाधित संख्येच्या पार्श्वभूमीवर गुरूवारीच नियमित रेल्वेसेवा 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय विमान सेवाही आणखी काही दिवसांसाठी स्थगित ठेवण्यात आली आहे.