मुंबई: लॉक डाऊनमुळे जगभरात गुंतवणूकदारांकडून सोन्याकडे गुंतवणूक वळत आहे. त्यामुळे दागीण्याची फारशी खरेदी होत नसली तरी सोन्याचे दर मात्र वाढत आहेत. सध्या भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला 50 हजार रुपयाच्या जवळ गेले असून दिवाळीपर्यंत ते 52 हजार रुपये होऊ शकतील असे विश्लेषकांना वाटते.
देशात आणि जागतिक पातळीवर सोन्याची दरवाढ अशीच चालू राहिली तर पुढील दोन वर्षात सोने 65 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सोन्याच्या फ्यूचर बाजारातील आकडेवारीवरून दिसून येते. याबाबत बोलताना अँजेल ब्रोकिंग या संस्थेचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, लघु पल्ल्यात सोन्याचे दर 50 हजार रुपयापर्यंत तर मध्यम पल्ल्यात म्हणजे दिवाळीपर्यंत ते 52 हजारापर्यंत जाऊ शकतात.
करोना व्हायरसमुळे जागतिक पातळीवर उद्योगांवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर अनेक देशांदरम्यान संघर्ष सुरू झाल्यामुळे उद्योगावर परिणाम होत आहे. त्यामुळे शेअर आणि इतर बाजारातील गुंतवणूक सोने आणि चांदीकडे वळत असल्यामुळे या दोन धातूंचे दर वाढत असल्याचे विश्लेषकांना वाटते.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताबरोबरच इतर देशांच्या विकास दराचे भाकीत कमी केले आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदी गुंतवणूकदारांना आकर्षक वाटत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये विविध देशातील रिझर्व्ह बॅंका सवलती जाहीर करीत असल्यामुळे चलनाचे अवमूल्यन होऊन महागाई वाढू शकते. अशा परिस्थितीत गुंतवणुकदार सोन्याचा आधार घेऊ शकतात. अशीच परिस्थिती कायम राहिली तर दोन वर्षात सोने 65 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, विश्लेषकांना वाटते.
दरम्यान दिल्ली सराफामध्ये शुक्रवारी सोन्याचे दर 240 रुपयांनी वाढून 49,060 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेले. जागतिक पातळीवर सोन्याचे दर ज्या प्रमाणात वाढत आहेत त्याच प्रमाणात ही वाढ आहे. दिल्ली सराफात शुक्रवारी चांदीचे दर 845 रुपयांनी वाढून तयार चांदीचा दर 49,300 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,764 डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर 18 डॉलर प्रति औंस होता.