नवी दिल्ली – डोपिंगच्या आरोपातून क्लीन चिट मिळालेल्या भारताच्या अव्वल वेटलिफ्टर संजीता चानू हिला अखेर जाहीर झालेला अर्जुन पुरस्कार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तीन वर्षांपूर्वी संजीताला हा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, त्यावेळी घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीत ती दोषी आढळली होती, त्यामुळे हा पुरस्कार तिला नाकारण्यात आला होता. त्यावेळी तिने या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात भारतीय वेटलिफ्टिंग संघटनेबाबत तक्रार याचिका दाखल केली होती.
दरम्यान, तिच्यावरील आरोपांची पुष्टी न झाल्याने तिला जागतिक वेटलिफ्टिंग महासंघाने क्लीन चिट देत पुढील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगीही दिली होती. मात्र, भारतीय संघटना सातत्याने ही परवानगी नाकारत असल्याने तिने न्यायालयात दाद मागितली होती. गुरुवारी न्यायालयाने तिची मागणी मान्य करत तिला अर्जुन पुरस्कार देण्यात यावा, असा आदेश दिला आहे.