सभापती शंकर जांभळकर यांची माहिती
केंदूर – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना करोनासह अपघाताच्या उपचारार्थ प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सभापती शंकर जांभळकर यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेतल्यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी जांभळकर यांच्यासह संचालक मंडळाचे आभार मानले.
गेल्या महिन्यात पिंपळे जगताप येथील उपबाजार समितीतील एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण बाजार समितीचे कर्मचारी आपल्या आरोग्याची चिंता व्यक्त करत होते.
दरम्यान पिंपळे जगतापच्या मार्केट यार्डमधील काही अडतदारांना देखील करोनाची बाधा झाल्याने अनेक दिवस मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दखल घेत राज्यात प्रथमच या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच दिले आहे. यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
या आरोग्य विमा कवचमध्ये समितीचे कायम कर्मचारी, सफाई कामगार, हमाल यांचा समावेश आहे. त्यांना करोनासह अपघाताच्या उपचारार्थ प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा कवच देण्यात येणार आहे. हा आरोग्य विमा कवच तात्काळ कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे उपसभापती विकास शिवले यांनी सांगितले. यावेळी येत्या काही दिवसांत मुख्य आणि उपबाजारातील संपूर्ण कारभार पारदर्शक आणि विश्वसनीय करणार असल्याचे सभापती जांभळकर यांनी सांगितले.
- सुशिक्षित सभापती; योग्य कारभार –
गेल्या महिन्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सुशिक्षित आणि पारदर्शक कारभार करणारे सभापती शंकर जांभळकर मिळाले आहेत. यांना सामाजिक कार्यकर्ते भास्कर पुंडे यांनी पत्र पाठवून समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यांनी याची गरज ओळखून संचालक मंडळाच्या साहाय्याने विनंतीला जांभळकर यांनी योग्य प्रतिसाद दिला आहे.