नवी दिल्ली – गेल्या काही आठवड्यांपासून बंडाचे निशाण फडकवलेल्या सचिन पायलट यांनी आज प्रथमच राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रियंका गांधी या देखील उपस्थित होत्या अशी माहिती काँग्रेस पक्षातील सुत्रांकरवी मिळाली आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही बैठक पार पडली असून राजस्थानातील राजकीय तिढा आता लवकरच सुटेल असा विश्वास पक्षातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.
या भेटीदरम्यान सचिन पायलट यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक पक्षांतर्गत समिती स्थापन करण्यात येईल असा प्रमुख निर्णय घेण्यात आला. याखेरीज स्वतः राहुल गांधी यांनी पायलट यांना ‘राजस्थान’बाबत असलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असा शब्द दिल्याचे समजते.
दोन आठवड्यांआधी प्रियंका गांधी व सचिन पायलट यांच्यादरम्यान राजधानी दिल्लीमध्ये एक बैठक पार पडली होती. या बैठकीनंतरच पायलट यांच्यासोबत पुढील पातळ्यांवर चर्चा करण्यात आली. अशीही माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे.
राहुल, प्रियंका व पायलट यांच्यादरम्यान दोन तास चाललेल्या बैठकीच्या वृत्ताला सचिन पायलट समर्थक आमदारांच्या गटाने देखील दुजोरा दिला आहे.