पुणे विभागात पाच लाख हेक्‍टरला विमा कवच

योजनेत 7 लाख 57 हजार 33 शेतकऱ्यांचा सहभाग

पुणे – नैसर्गिक आपत्ती, कीडी आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी यंदाच्या खरिप हंगामासाठी राबविलेल्या पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत पुणे विभागातील पाच लाख 78 हजार 416 हेक्‍टरला संरक्षण मिळाले आहे. या योजनेत पुणे विभागातील सात लाख 57 हजार 33 शेतकरी सहभागी झाले असून त्यापोटी विमा कंपन्यांना एक हजार 441 कोटी, 81 लाख 37 हजार रुपयांची रक्‍कम संरक्षित झाली आहे. अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

यंदाच्या खरिप हंगामासाठी जुन-जुलै महिन्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग अशा विविध पिकांसाठी विमा योजना राबविण्यात आली. या योजनेत सहभागी होण्यासाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील अगदी शेवटच्या दिवसापर्यंत या योजनेकरिता अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही ऐच्छिक योजना आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्‍के निश्‍चित करण्यात आला आहे. तर खरिप पिकांसाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता फक्त दोन टक्‍के तर नगदी पिकांसाठी दोन टक्‍के हप्ता होता. पुणे विभागातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 24 कोटी 97 लाख 42 हजार, राज्य सरकारने 38 कोटी 53 लाख 32 हजारांचा हिस्सा असा एकूण 63 कोटी 50 लाख 75 हजार रुपयांचा हप्ता विमा कंपनीकडे जमा केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.