पिंपरी, दि. 17 – करोनानंतर आता कुठे उसंत मिळाली असताना आता पुन्हा एन्फ्लुएंझा एच3एन2 या नवीन विषाणूने डोके वर काढले आहे. एक जानेवारीपासून या विषाणूची बाधा झालेले 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला असला तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, तर आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.
शहरात या विषाणुची बाधा झालेले सात रुग्ण आढळून आले. त्यातील सहाजणांवर योग्य उपचार करण्यात आले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, सध्या रुग्णालयात या विषाणूने ग्रस्त असलेला एकही रुग्ण नसल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही, असेही पालिकेने नमूद केले आहे.
सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इत्यादी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या आजारावर महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा, असे आवाहन सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे