पुणे – गुणवत्ता व सातत्य असल्यास उद्योगात यश हमखास मिळते. आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटला पाहिजे, असे काम आयुष्यात करा. मोबाइलमध्ये स्टेटस् ठेवण्यापेक्षा स्वतःचे स्टेटस बनवावे. समाजात उत्तम स्थान निर्माण करावे, असे मत उद्योजक राहुल पापळ यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मित्र मंडळाच्या व्होकेशनल विभागामार्फत आयोजित संवाद यशस्वी उद्योजकांशी या मालिकेतील “माझी व्यावसायिक जडणघडण’ याविषयावर ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, प्राचार्य डॉ. डी. जी. गोल्हार, उपप्राचार्य रमेश पंडित आदी उपस्थित होते.
स्वतःचा उद्योग सुरू करावा, असे ध्येय ठेवून व्यवसायकांशी चर्चा करून “लाडाची कुल्फी’ हा ब्रॅंड सुरू केला. आज, या ब्रॅण्डची कोट्यवधींची उलाढाल आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात 400 शाखा आहेत. आणखी दोन हजार शाखा प्रस्तावित आहे. गुणवत्ता व सेवेत सातत्यामुळे उद्योगात टिकून आहे, असे राहुल पापळ यांनी स्पष्ट केले.
व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले माजी विद्यार्थी हजारो रुपये कमवत आहेत. त्यामुळे ज्याच्याकडे कौशल्य आहे. तो पुढे शिकणार आहे. महाविद्यालयात 33 वर्षांत हजारो विद्यार्थी उद्योजक झाले आहेत. हेच विद्यार्थी महाविद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांना नोकरी देत आहे, असे भाऊसाहेब जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी सध्या यशस्वी उद्योजक असलेले शिवम साळवी, ललित माळी, किरण मरळ, धीरज रोकडे, भूषण पोळ, संदीप मेढेकर या यशस्वी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका डॉ. सुजाता शेणई यांनी केले. डॉ. डी. जी. गोल्हार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे पर्यवेक्षक राजेंद्र खजुरे, सुनील पवार, कुंदन पवार, इंदिरा अभंग यांनी केले.