पुणे -राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध पुरस्कारांसाठीचे मानकरी निवडण्यासाठीच्या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. “भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कारा’साठीही निवड समिती नव्याने स्थापन करण्यात आली आहे. सरकारी सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सर्व समित्यांचे अध्यक्ष आहेत.
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समित्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी असेल. “विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ समितीमध्ये मंगला बनसोडे करवडीकर, छाया अंधारे खुटेगावकर, प्रा. प्रवीण जाधव, प्रा. योगेश निकम, देवानंद माळी, डॉ. प्रकाश खांडगे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. “ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारा’चे मानकरी निवडण्यासाठीच्या समितीमध्ये डॉ. अशोक कामत, शिवाजी महाराज मोरे, आचार्य तुषार भोसले, डॉ. मुकुंद दातार, राजेश महाराज देगलूरकर यांचा समावेश आहे. “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार समिती’मध्ये उस्ताद उस्मान खॉं, डॉ. अश्विनी भिडे- देशपांडे, डॉ. प्रभा अत्रे, प्रज्ञा देशपांडे, पं. अजय पोहनकर यांचा समावेश आहे.
“व्ही. शांताराम जीवनगौरव’मध्ये राजदत्त, सई परांजपे, सुधीर नांदगांवकर, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, नीना कुलकर्णी यांची नियुक्ती केली गेली आहे. “राजकपूर जीवनगौरव’ पुरस्कार निवड समितीमध्ये सुभाष घई, विवेक अग्निहोत्री, मोहन जोशी, मधुर भांडारकर, वेद राही यांचा समावेश आहे.
“नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार’ समितीत गिरीश ओक, अशोक समेळ, अशोक सराफ, तर “संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ निवड समितीत अरविंद पिळगावकर, शुभदा दादरकर, माधव खाडीलकर, भरत बलवल्ली हे आहेत. दरम्यान, “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना केली असून पं. ब्रिज नारायण, पं. सत्यशिल देशपांडे, पं. उल्हास कशाळकर, अशोक पत्की, अंबरीश मिश्र हे अशासकीय सदस्य म्हणून समावेश आहे.