मुंबई- मशिदींवरील भोंग्यांवरून राज ठाकरे आक्रमक विधाने करत असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज यांना प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि मराठीवर खरंच प्रेम असेल तर खाल्लेल्या मिठाला जागा. महाराष्ट्राची बदनामी करू नका. तुम्हाला जे भाषण करायचे ते करा पण आम्हाला काम करू द्या.
महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही, असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला आहे. दरम्यान, भाषण करून दोघांच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राची बदनामी करणं तुम्हाला शोभत नाही, असा अप्रत्यक्ष टोला सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.
मुंबईत गुढीपाडव्याला झालेल्या सभेनंतर राज यांच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना आणि संभ्रम दूर करण्यासाठी राज यांनी ठाण्यात सभा घेऊन आपल्या विरोधकांचा समाचार घेतला होता.
तसेच आपण भोंग्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट करत सरकारला अल्टीमेटम दिला होता. मात्र त्यानंतरही याच धाग्यावरून राज यांना लक्ष्य केले जात असल्यामुळे आता आपल्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेत राज या आरोपांना पुन्हा उत्तर देणार असे मानले जात आहेत.