नवी दिल्ली – लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे नवे लष्करप्रमुख बनणार आहेत. सध्या ते लष्कराच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
विद्यमान लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे 30 एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची जागा पांडे घेतील. लष्करप्रमुख बनणारे ते पहिलेच कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सचे अधिकारी ठरणार आहेत. लष्कराचे उपप्रमुख बनण्याआधी पांडे यांनी सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेश क्षेत्रांत प्रत्यक्ष ताबा रेषेचे (एलएसी) रक्षण करणाऱ्या पूर्व लष्करी कमानचे नेतृत्व केले.
पांडे डिसेंबर 1982 मध्ये बॉम्बे सॅपर्समध्ये रूजू झाले. त्यांनी प्रदीर्घ सेवेत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन पराक्रमवेळी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत सज्ज असणाऱ्या इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व त्यांनी केले. अंदमान आणि निकोबार कमानचे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले.
उल्लेखनीय सेवेबद्दल पांडे यांना परम विशिष्ट सेवा पदक आणि इतर पदकांनी सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने नवे लष्करप्रमुख म्हणून पांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.