Pune | नदीपात्रात टाकलेल्या जाळीत मगरीऐवजी अडकला राडारोडा

पुणेकरांच्या उत्कंठेचा "कचरा'!

पुणे – नदीपात्रात मगर ( crocodile ) दिसल्याच्या माहितीनुसार शुक्रवारी वनविभागाने भिडे पुलावरुन जाळी पाण्यात सोडली. मात्र, यात मगर सापडण्याच्या ऐवजी मोठ्या प्रमाणावर कचरा आणि जलपर्णीच अडकल्याचे चित्र आहे. दरम्यान, मगर सापडेल म्हणून उत्कंठेने दररोज नदीपात्राकडे फेरफटका मारण्यास जाणाऱ्या पुणेकरांचा या कचऱ्याने मात्र पुरता भ्रमनिरास झाला आहे.

मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा आणि जलपर्णी असणे ही पुणेकरांसाठी नवीन बाब नाही. या पात्रात प्लॅस्टिक पिशव्या, बॉटल्स, निर्माल्य, राडारोडा असा विविध प्रकारचा कचरा वाहताना दिसत असून, काही भागात कचरा साचलेला दिसतो. याशिवाय मोठ्या प्रमाणावर जलपर्णी देखील नदीत पसरली असल्याचे दिसते. परंतु, हा कचरा नियमितपणे स्वच्छ करण्यात येत नाही. पण, आता हा कचरा गोळा करण्यासाठी मगरीसाठी लावलेले जाळे उपयुक्त ठरल्याचे चित्र आहे. मगरीला शोधण्यासाठी वन विभागाने लावलेल्या जाळीत देखील कचरा आणि जलपर्णी साचली आहे.

मात्र, मंगळवारी सायंकाळपर्यंत वनविभागाला या मगरीचा शोध काही लागला नाही. त्यामुळे मंगळवारपर्यंत (16 फेब्रुवारी) ही जाळी कायम ठेवण्यात आली आहे. परंतु, या जाळीत मगर सापडण्याऐवजी कचराच साचत आहे. त्यामुळे ही जाळी कचरा शोधण्यासाठी तर बसवली नाही ना, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रकरण काय?

डेक्कन जिमखाना परिसरात भिडे पुलाजवळ नदीपात्रात मगर दिसल्याची माहिती एका नागरिकाकडून “रेस्क्‍यू’ पथकाला मिळाल्यानंतर वन विभाग, पोलीस प्रशासन, “आरईएसक्‍यू’ या संस्थेचे प्रतिनिधींनी या परिसरात पाहणी केली. दिवसभर चाललेल्या या शोध मोहिमेनंतर, शुक्रवारी सायंकाळी वनविभागाने भिडे पूलाजवळ जाळी आणि एस.एम.जोशी पुलाच्या दिशेला पिंजला लावला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.