दत्तात्रय आंबुलकर
“वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते. पण आजकाल वाचन संस्कृतीकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. हाती असलेल्या मोबाइलवर हवी ती माहिती सहजगत्या उपलब्ध होत आहे. त्यामुळे पुस्तकांकडचा ओघ आणि ओढा कमी होणार का अशी धास्ती निर्माण झाली असतानाच बेळगावच्या केंद्रीय ग्रंथालयाने वाचक आणि वाचनसंस्कृती मोठ्या नेटाने व यशस्वीपणे जपून ठेवली आहे. त्याचीच ही वाचनीय कथा-
बेळगावच्या केंद्रीय ग्रंथालयाने समाजात वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी जी धडपड सातत्याने चालविली आहे. त्यामध्ये अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत वाचनाची आवड लागावी व ती कायम राहावी यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ग्रंथालयाच्या भव्य इमारतीमध्ये खास मुलांसाठी वेगळे दालन तयार करून त्याठिकाणी चिल्ड्रन्स लायब्ररी तयार करण्यात आली आहे. त्याठिकाणी विद्यार्थी वाचकांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य पण ठेवण्यात आले आहे. या विद्यार्थी ग्रंथालयात विद्यार्थ्यांसोबत येणारे त्यांचे पालक-नातेवाईक यांच्यासाठी विशेष दालन तयार करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी प्रोत्साहन-मार्गदर्शन मिळावे यासाठी स्पर्धा परीक्षांना पूरक व आवश्यक अशा पुस्तकांची सोय करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागणाऱ्या पुस्तकांच्या किमती मोठ्या असतात. मात्र, केंद्रीय वाचनालयात आता ही पुस्तके मिळत असल्याने सर्व गरजू विद्यार्थ्यांची सोय तर झालीच, त्याशिवाय मोठ्या संख्येत विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी मार्गदर्शन मिळण्याचा दुहेरी फायदा पण झाला. आज या पुस्तकांचा लाभ सरासरी 100 विद्यार्थी घेत असतात.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकाळी कॉलेज व संध्याकाळी ट्यूशन क्लास करण्यासाठी करावी लागणारी ये-जा खर्चिक असते व अनेकांना हा खर्च झेपत नाही. अशा ग्रामीण विद्यार्थ्यांना मधल्या वा दुपारच्या कमी गर्दीच्या वेळेत अभ्यास-वाचन, टिपणे काढण्याची सोय पण उपलब्ध करून दिल्याने त्याचा मोठा फायदा बेळगाव आणि परिसरातील ग्रामीण विद्यार्थी दरवर्षी घेत असतात. हा उपक्रम सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत नित्यनेमाने सुरू असतो. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेल्या केंद्रीय ग्रंथालयात लाखो पुस्तकांचा ठेवा वाचकांसाठी उपलब्ध आहे. सर्व प्रकारची आणि विविध भाषांमधील पुस्तके, वृत्तपत्रे, साप्ताहिके-मासिके, धार्मिक, ऐतिहासिक ग्रंथ या ठिकाणी वाचनासाठी सदस्य-वाचकांना उपलब्ध करून दिली जातात.
बेळगाव महापालिका क्षेत्रात केंद्रीय वाचनालयाची 27 केंद्र कार्यरत आहेत. याशिवाय 1 फिरते वाचनालय सुरू करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. बेळगाव जिल्ह्यात 14 नगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवर वाचनालये सुरू केलेली आहे. विद्यार्थ्यांना व वाचकांना जागा अपुरी पडू लागल्याने आता केंद्रीय वाचनालयाने डिजिटल लायब्ररीची संकल्पना राबविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.