भारतात परत येऊ देण्याचा प्रस्ताव होता- झकीर नाईक

झकीर नाईक याचा सरकारबाबत गौप्यस्फोट
नवी दिल्ली :  जम्मू काश्‍मीरबाबतच्या भूमिकेसाठी सरकारला पाठिंबा दिल्यास मनी लॉन्डरिंगचे आरोप रद्द करून भारतात सुखरूपपणे परतण्याचा प्रस्ताव आपल्याला दिला गेला होता, असा गौप्यस्फोट वादग्रस्त इस्लामी व्याख्याता झकीर नाईकने केला आहे.

भारत सरकारचे प्रतिनिधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपल्याला भेटले होते. त्यांनीच आपल्याला हा प्रस्ताव दिला होता. मात्र आपण तो नाकारला, असेही झकीर नाईकने आज प्रसिद्धीस दिलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटले आहे.
मलेशियातील पुत्राजय शहरात सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यात ही खासगी भेट झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वैयक्तिक सूचनेनुसार भेटायला येणार असल्याचे या प्रतिनिधीने आपल्याला सांगितले होते. आपल्या बरोबरचे गैरसमदूर करून सुखरूप मायदेशी येऊ देण्याची भारत सरकारची तयारी असल्याचे या प्रतिनिधीने सांगितले.

अन्य मुस्लिम देशांबरोबरचे भारताशी असलेले संबंध सुधारण्यासाठी नाईकच्या संपर्काचा वापर करण्यात यावा, असेही या प्रतिनिधीने सुचवले. ही चर्चा काही तास चालली. जम्मू काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करण्याच्या भाजप सरकारच्या कृतीला पाठिंबा देण्याची अटही या प्रतिनिधीने घातली. मात्र आपण त्यास साफ नकार दिल्याचे झकीर नाईकने सांगितले आहे.

प्रस्ताव फेटाळल्यानंतरही या प्रतिनिधीने आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप सरकारविरोधात कोणतेही उघड वक्‍तव्य न करण्याची सूचना केल्याचेही झकीर नाईकने सांगितले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला भारतातील जे मुस्लिम नेते पाठिंबा देत आहेत, त्यांना नक्कीच “ब्लॅकमेल’ केले गेले असावे अथवा त्यांच्यावर दबाव आणला गेला असावा, असेही नाईक म्हणाला.

मालदिवला पळण्याचा प्रयत्न
गेल्या तीन वर्षांपसून मलेशियात रहात असलेल्या झकीर नाईकवर भारतात प्रक्षोभक भाषणांनी हिंसा भडकावणे, जातीय सलोखा नष्ट करणे आणि बेकायदेशीर कृत्ये करण्याचा आरोप आहे.

याशिवाय ढाका इथे जुलै 2016 मध्ये होली आर्टीसन बेकरीवरील दहशतवादी हल्ला प्रकरणी बांगलादेश आणि भारतातही त्याच्याविरोधात तपास सुरू आहे. “झकीर नाईक मालदिवला येऊ इच्छितो आहे. मात्र त्याला परवानगी दिली गेली नाही.’ असे मालदिवच्या संसदेच्या सभापतींनी काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले असताना सांगितले होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.