दत्तात्रय आंबुलकर
हर्शिनी कान्हेकर हिला लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास होता. शालेय-महाविद्यालयीन काळात ती विविध स्पर्धांमध्ये आवर्जून सहभागी होत असे. असेच काहीतरी वेगळे करण्याच्या भूमिकेतून हर्शिनीला सैन्यदल-पोलीस यासारख्या सेवेत काम करण्याची इच्छा होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने “एमबीए’ला प्रवेश घेतला, पण तिथे तिचे मन रमत नव्हते.
त्याच दरम्यान हर्शिनीच्या वडिलांनी तिला नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली व तिने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरला. “नॅशनल फायर सर्व्हिसेस कॉलेज’ हे राष्ट्रीय स्तरावरील भारतातील एकमेव व जगातील दुसऱ्या क्रमांकाचे कॉलेज. सध्या पूर्णतः मुलांनाच शिक्षण देणारी, अशा कॉलेजमध्ये एक मुलगी प्रवेशासाठी येते, ही बाब अर्थातच आश्चर्याची व चर्चेची झाली. काहींनी तिचा हा प्रयत्न हसण्यावरी नेला. वरिष्ठांनी या अभ्यासक्रमासाठी मुली प्रवेश अर्ज करीत नाहीत असे समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यावर नॅशनल फायर कॉलेजने अभ्यासक्रम प्रवेश जाहिरातीत मुली अर्ज करू शकत नाहीत, असे नमूद केलेले नसल्याने ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली.
आपल्या प्रयत्नांना अधिक पाठबळ मिळावे म्हणून हर्शिनीने आपल्या एका मैत्रिणीला पण त्यासाठी प्रवृत्त केले. या जिद्दीच्या प्रयत्नांमुळे हर्शिनीचा प्रवेश अर्ज स्वीकारला गेला व तिला प्रवेश मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. मुलाखतीला जाताना हर्शिनी प्रसंगानुरूप म्हणजेच सूट-बुट अशा पेहेरावात गेली. एक मुलगी अभ्यासक्रमात पहिल्यांदा प्रवेश घेत असल्याने तिला पाहण्यासाठी संस्थेचे कर्मचारी, विद्यार्थी-उमेदवार इत्यादींनी मोठी गर्दी केली होती.
प्रवेश मुलाखती दरम्यान मुलाखत घेणाऱ्या तज्ज्ञ मंडळींनी हर्शिनीला चाकोरीबाहेरचे अवघड प्रश्न विचारले. अभ्यासक्रम खूप अवघड व वेगळा आहे तुम्हाला हे सारे जमेल का? तुम्ही अभ्यासक्रमाशी संबंधित प्रात्यक्षिके करू शकाल का? असा प्रश्नकर्त्यांचा नकारात्मक रोख होता. मात्र अशा प्रश्नांच्या भडिमाराने डगमगून न जाता हर्शिनीने मोठ्या आत्मविश्वासाने तोंड दिले व अभ्यासक्रमास प्रवेश मिळविला.
प्रवेश तर मिळाला पण तिच्या राहण्याची समस्या निर्माण झाली. त्यावर तिचे पालक आणि प्रशासनाने तोडगा काढत तिला घरी राहून अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आला व या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमाला तिने सुरुवात केली.
अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात असतानाच तिला कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून ओएनजीसीच्या मेहसाना- गुजरात प्रकल्पामध्ये थेट प्रशिक्षणार्थी अग्निशमन अधिकारी म्हणून निवडीची संधी मिळाली व आगीशी खेळण्याच्या धाडसी करिअर उद्दिष्टाची पूर्तता झाली.