नारायणगाव -जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने रेशनिंगचा वाटपासाठी आणलेला 4 हजार 378 किलोचा गहू, तांदूळ आणि साखर अशा सरकारी मालाचा अपहार केल्याप्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार आणि त्यांचा मुलगा या दोघांवर अपहाराचा गुन्हा नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
स्वस्त धान्य दुकानदार सखाहरी बबन भालेराव व त्यांचा मुलगा निलेश सखाहरी भालेराव (वय 38, दोन्ही रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहारप्रकरणाची फिर्याद पुरवठा अधिकारी रवींद्र पांडुरंग दळवी (रा. कल्याण पेठ, जुन्नर) यांनी दिली आहे.
निमगाव सावा येथील स्वस्त धान्य दुकान हे सखाहरी बबन भालेराव हे चालवित आहेत. दि.25 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान भालेराव व निलेश भालेराव यांनी संगनमताने गहू 2588 किलो, तांदूळ 1760 किलो आणि साखर 30 किलो, असे एकूण 4 हजार 378 किलो दुकानांतील मालाचा अपहार केल्याची फिर्याद पुरवठा अधिकारी दळवी यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी अपहारप्रकरणी पिता-पुत्रावर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3, 7 व भा.दं.वि. कलम 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करीत आहेत.
निमगाव सावाचे मंडलाधिकारी नितीन चौरे म्हणाले की, तहसीलदार कोळेकर यांच्या आदेशाने स्वस्त धान्य दुकानदराच्या घरातील धान्य साठ्याचा पंचनामा करून दुकानातील सर्व दफ्तर जप्त केले आहे. जिथे काही धान्य विकले आहे. त्याचाही पंचनामा केला आहे. दुकानदाराला नोटीस पाठवून खुलासा मागितल्याने पुढील कारवाईस वेळ लागला आहे.
अपहाराच्या गुन्ह्याबाबत उलट सुलट चर्चा रेशनिंग विक्रेते भालेराव याने दि. 7 रोजी एका वाहनांतून दुकानातील धान्य घरी नेले. काही तांदूळ पोती स्थानिक लोकांना विकली. हा प्रकार काही जागरूक नागरिकांमुळे उघडकीस आला.
नागरिकांनी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर कोळेकर यांच्या आदेशाने दुकानाचा पंचनामा करून रेशनिंग दुकान सील करण्यात आले. मात्र, या घटनेनंतर तीन दिवसांनी जुन्नर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने अपहारचा गुन्हा केल्याने याबाबत उलट-सुलट चर्चा जुन्नर तालुक्यात सुरू आहे.
निमगाव सावा येथील स्वस्त धान्य दुकानदारावर जीवनावश्यक वस्तूचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदार सखाहरी बबन भालेराव यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवून नवीन स्वस्त धान्य दुकानदाराची नियुक्ती करण्यात येईल. प्रत्येक स्कीमनुसार धान्य असल्याने अपहाराची रक्कम काढण्यात आलेली नाही.
– हनुमंत कोळेकर,
तहसीलदार, जुन्नर.