दत्तात्रय आंबुलकर
एक यशस्वी जिद्दी महिला अधिकारी म्हणून प्रदेश-देश स्तरावर नावलौकिक कमावणाऱ्या उमा माहेश्वरींचं बालपण दक्षिण तमिळनाडूच्या तिरूववेल्लीमध्ये गेले. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर तिने एमबीएसाठी प्रवेश घेतला. आपण आयएएससारखी प्रशासकीय पात्रता देऊ असे उमाला कधीही वाटले नव्हते. मात्र तिच्या एका प्राध्यापकाने उमाला ही परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे 2011 मध्ये पहिल्यांदा प्रशासन सेवा पात्रता परीक्षा दिली. दरम्यान, मुळातच अभ्यासात हुशार असणाऱ्या उमाला एमबीए होताच तीन कंपन्यांकडून नोकरीचे प्रस्ताव आले व उमाने आपले कॉर्पोरेट करिअर सुरू केले.
अशा प्रकारे कॉर्पोरेट करिअरला यशस्वीपणे सुरुवात करणाऱ्या उमाच्या आयुष्यात वैयक्तिक स्तरावर दोन मोठ्या दुर्घटना घडल्या व त्या म्हणजे तिच्या आई-वडिलांचा अकाली मृत्यू. यामुळे आयुष्यातील पोकळीचा सामना करीत असताना कंपनीतील आपल्या जबाबदारीसह उमाने केंद्र शासनाची लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची तेवढ्याच प्रयत्नांसह तयारी सुरू केली.
पहिल्या पाच प्रयत्नांमध्ये उमा लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाली नाही. मात्र आपल्या या प्रयत्नात उमा खचली नाही. तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. तिचा स्वतःवर व आपल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास होता.
यातूनच उमा माहेश्वरींनी 2018 मध्ये कॉर्पोरेट कंपनीची आपली प्रस्थापित नोकरी सोडून आपला पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला देण्याचे ठरवून त्यानुसार नव्याने प्रयत्न सुरू केले. दरम्यान, कौटुंबिक स्तरावर उमाचा विवाह झाला व तिला मुलगी पण झाली. त्यामुळे घर, संसार व अभ्यास सांभाळल्याचे तिहेरी आव्हान उमापुढे होती.
घर आणि लहान मुलीला सांभाळत उमाने नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली. त्यासाठी प्रारंभिक परीक्षेची तयारी करताना उमा पहाटे 5 वाजता अभ्यासाला उठायची. त्यानंतर पहाटे 6 वाजेपर्यंत ती रोज अभ्यास करायची. पुढचे तीन तास ती घरकामासाठी द्यायची. नंतर 10 वाजल्यापासून दुपारपर्यंत पुन्हा अभ्यास करायची.
दुपारी मुलगी घरी आल्यावर उमा मुलीसाठी वेळ द्यायची. संध्याकाळी उमाचे पती मुलीला सांभाळायचे त्यावेळी उमा पुन्हा अभ्यासाला लागायची. या नियोजनपूर्ण व ठोस प्रयत्न आणि अभ्यासांच्या परिणामी उमा प्रारंभिक परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाली.
या यशाने प्रेरित झालेल्या उमा माहेश्वरी यांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नेटाने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी शांतपणे व विनाव्यत्यय अभ्यास व्हावा म्हणून रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत अभ्यास करायची. यातूनच 2018 मध्ये उमा लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर 2019च्या सुरुवातीला तिची मुलाखतही यशस्वीपणे झाली व अशा पद्धतीने उमा माहेश्वरींच्या नव्या करिअर वाटचालीला सुरुवात झाली.