पिंपरी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे येत्या रविवारी (दि. 11) श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असून त्यासाठी रथाची संपूर्ण तपासणी करून रथाला फिटनेस सर्टीफिकेट देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा आनंद सोहळा असलेला पालखी सोहळा अगदी तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. शनिवारी (दि. 10) संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा तर, रविवारी (दि. 11) श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान श्री क्षेत्र पंढरपूरकडे ठेवणार आहे. पालखी सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या रथाची तपासणी काटेकोरपणे करण्यात येते. तसेच या रथाची डागडुजी, रंगरंगोटी केली जाते. रथ संपूर्ण नवीन दिसेल, चमकेल अशा पद्धतीने सजावट केली जाते. आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रथाची डागडुजी रंगरंगोटी करण्यात आली असून सुमारे 250 किलोमीटरचे हे अंतर पार पाडण्यासाठी रथाची तपासणी करण्यात आली.
सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून माऊलींच्या रथाचे सर्व मेकॅनिकल पार्टस, ब्रेक लायनर, रथ ओढण्याची क्षमता, रथातील लाइट, योग्य सर्व्हिसिंग केल्याची तपासणी या वेळी करण्यात आली. तसेच वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केल्याची माहिती राज्य उपअभियंता संदीप देशमुख यांनी दिली.
वाढत्या तापमानामुळे पहिल्यांदा डी फ्रीजर
यंदा तापमानात मोठी वाढ पहावयास मिळत असल्याने पहिल्यांदाच पालखी सोहळ्यासोबत डी फ्रीजर नेण्यात येत आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उष्णता अधिक जाणवत आहे. दुग्धजन्य व इतर पदार्थ खराब होऊ नये, यासाठी पहिल्यांदाच डी फ्रीजर नेण्यात येत आहे.