शेवगाव – कोणत्याही नुकसान झालेल्या पिकाची नोंद घेणे राहू नये यासाठी तसेच पंचनाम्याचे काम लवकरात लवकर उरकण्यासाठी ते काम तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी एकत्रितपणे करण्याऐवजी त्यांनी स्वतंत्रपणे एकेक गाव उरकावे. पिकांमध्ये सध्याही सर्वत्र पाणी असल्याने शेतात जाणे अशक्य आहे तेव्हा पूर्ण पिकाचे पंचनामे करावेत. नुकसानीबाबत टक्केवारीचा घोळ न घालता शभंर टक्के नुकसान धरुन सरसकट सर्व पिकाचे पंचनामे करावेत अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रशासनाला दिल्या.
खासदार विखे यांनी आज (दि.4) तालुक्यातील हातगाव, मुंगी, गदेवाडी भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बाधित पिकांची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार विनोद भामरे, प्रभारी गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, कृषी अधिकारी किरण मोरे, विद्युत उपअभियंता विश्वास नरके, जि.प. सदस्य राहूल राजळे, भाजपा तालुकाध्यक्ष बापु पाटेकर, नगरसेवक सागर फडके, चंद्रकांत गरड, बापुराव देशमुख, डॉ. निलेश मंत्री, शिवाजी समिंदर, दत्तात्रय भराट, काशीनाथ चौधरी, विठ्ठल अभंग, चंद्रकांत भराट आदी समवेत होते.
खासदार विखे म्हणाले, अवकाळी व अतिवृष्टीने पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार प्रशासनाच्या चुका लक्षात आल्या आहेत. तलाठी संख्या कमी असल्याने ग्रामसेवक, कृषी सहायक यांचा तलाठी म्हणुन उपयोग करा. विमा कंपनीच्या प्रतिनिधीने 9 ते 5 या कालावधीत फॉर्म स्वीकृतीसाठी तहसील कार्यालयात बसावे. विमा कंपनीच्या काही अटी शिथील करण्यात आल्या आहेत तर तलाठ्यांची टक्केवारी विमा कंपन्यास बंधनकारक राहील असे मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचे सांगुन शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. नुकसानीबाबत टक्केवारीचा घोळ न घालता शंभर टक्के नुकसान धरुन सरसकट सर्व पिकाचे पंचनांमे करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
पंचनामे झालेल्या नावाच्या याद्या त्या त्या गावच्या नोटीस बोर्डवर दवंडी देऊन लावाव्यात. त्या शेतकऱ्यांनी पहाव्यात नाव नसेल त्यांनी लगेच भेटावे. आमदार व आपण मिळून ते मार्गी लावू. आठवड्याभरात आपलेही संपर्क कार्यालय शेवगाव येथे सुरू करू. आम्ही सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असल्याने आपणास न्याय देऊ. असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला. यानंतर शेवगाव तहसील कार्यालय आढावा बैठकही घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.